भोपाळच्या (Bhopal) भाजप खासदार (BJP MP) साध्वी प्रज्ञा ठाकूर (Pragya Thakur) यांनी वादग्रस्त विधान करणे ही काही नवीन बाब नाही. आपल्या वक्तव्यांमुळे साध्वी नेहमीच वादात आणि चर्चेत राहिल्या आहेत. आता ठाकूर यांना सकाळच्या अजानचा (Morning Azan) त्रास होत आहे, ज्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. एका कार्यक्रमादरम्यान प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, पहाटे 5 वाजता अजानचा मोठा आवाज ऐकू येतो ज्यामुळे झोप खराब होते. रामादलमच्या बॅनरखाली मंदिराच्या बांधकामाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बैरसियामध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मिरवणूक काढण्यात आली. साध्वी प्रज्ञा ठाकूरही या कार्यक्रमाला पोहोचल्या. अशा धार्मिक कार्यक्रमात खासदार यांनी हे वक्तव्य केले.
त्या म्हणाल्या की, असे काही रुग्ण आहेत ज्यांना रात्रभर झोप येत नाही, आजाननंतर त्यांचा रक्तदाब वाढतो. पुढे त्या म्हणाल्या की, ‘ऋषी-मुनींच्या ध्यानाची वेळही ब्रह्म मुहूर्तापासून पहाटे 4 पासून सुरु होते, पण त्याची कोणालाच पर्वा नाही. इतर समाजाच्या प्रार्थनेच्या वेळी मोठ्या आवाजात भजने वाजवू नका, असे सांगितले जाते, परंतु हे लोक रोज सकाळी लाऊडस्पीकर लावून लोकांना त्रास देतात.’
खासदार म्हणाल्या, ‘ते म्हणतात आमच्या धर्मात, आमच्या इस्लाममध्ये इतर कोणत्याही धर्माची पूजा ऐकण्याची परवानगी नाही. परंतु हिंदू सर्वांची काळजी घेतो, आम्हाला सर्व धर्मांचा समान आदर आहे, परंतु इतर कोणताही धर्म हे करत नाही.’ दुसरीकडे, भोपाळ सेंट्रलचे काँग्रेस आमदार आरिफ मसूद यांनी प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, त्यांनी खासदार म्हणून आपल्या शब्दांची आणि प्रतिष्ठेची काळजी घ्यावी, असे म्हटले आहे. ते म्हणाले की, एका धर्माचा आवाज दुसऱ्या धर्माला कधीच दुखावत नाही. काँग्रेसचे प्रवक्ते जेपी धनोपिया यांनी ठाकूर यांच्यावर जातीय अशांतता निर्माण केल्याचा आरोप केला आहे. (हेही वाचा: हा वेडेपणा की देशद्रोह? कंगना रनौत हिच्या विधानावर भाजप खासदार वरुण गांधी यांचा सवाल)
दरम्यान, यापूर्वीही साध्वी प्रज्ञा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिल्या आहेत. यापूर्वी त्यांनी हिंदू मंदिरांचा पैसा अल्पसंख्याक आणि पाखंडी लोकांकडे जात असल्याचे म्हटले होते. अजानवर आक्षेप घेणारी ही पहिली व्यक्ती नाही. या आधी प्रसिद्ध गायक सोनू निगमने काही वर्षांपूर्वी अजानवर आक्षेप घेतला होता.