
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची नागरिकता धोक्यात असून, लवकरच ती संपुष्टात येऊ शकते असा दावा भाजप नेते, खासदार सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी केला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) द्वारा हैदराबाद विद्यापीठात आयोजित 'सीएए- राजकारणापलीकडे जाऊन काळाची गरज' परिसंवादात स्वामी बोलत होते. या वेळी बोलताना 'सोनिया-राहूल गांधी यांना मिळालेली नागरिकता लवकरच संपुष्टात येऊ शकते. त्याबाबतची फाईल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टेबलवर आहे' असे स्वामी यांनी सांगितले. द हिंदूने याबाबत वृत्त दिले आहे.
भारतीय संविधानाचा दाखला देत स्वामी यांनी म्हटले की, जे लोक भारतात राहात असून, दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारतात त्यांचे भारतातील नागरिकत्व समाप्त होईल. याच वेळी पुढे बोलताना स्वामी म्हणाले, राहूल गांधी यांनी इंग्लंडमध्ये व्यवसाय सुरु करण्यासाठी ब्रिटीश नागरिकता स्वीकारण्याचा पर्याय निवडला होता. दरम्यान, राहुल गांधी हे थेट नागरिकत्वासाठी अर्ज करु शकतात कारण त्यांचे वडील भारतीय होते. परंतू, ते सोनिया गांधी यांची पत वापरत भारतात नागरिकता मिळवू शकत नाहीत. त्या भारतीय नागरिक नव्हत्या असा दावाही त्यांनी या वेळी केला. (हेही वाचा, 'GST म्हणजे 21 व्या शतकातील सर्वात मोठा वेडेपणा', भाजप नेते, खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांचा मोदी सरकारला घरचा आहेर)
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) बाबत बोलताना स्वामी म्हणाले, 'सीएएला योग्य पद्धतीने समजून घेतले गेले नाही. या कायद्याला विरोध करणाऱ्यांनीही या कायदा निट वाचला नाही. भारतीय मुसलमान या कायद्यामुळे कोणत्याही प्रकारे अडचणीत येणार नाही. तो अडचणीत येईल असा अंदाज बाळगणेही चुकीचे आहे. हा तर्कही हस्यास्पद आहे की, पाकिस्तान आणि बांग्लादेश येथून येणाऱ्या मुस्लिम नागरिकांना मानले पाहिजे. पाकिस्तान रोहिंग्या मुसलमानांना आपल्या देशात प्रवेश करण्याची परवानगी देत नाही आणि इथे काही लोक म्हणतात की पाकिस्तान्यांनी इथे यावे.'