
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमधील (Indore) एका महिलेने तिच्या ब्राझिलियन वॅक्सिंगवेळी (Brazilian-Bikini Waxing) मोठा घोटाळा झाल्याने स्पाविरुद्ध खटला दाखल केला आहे. ही घटना नोव्हेंबर 2021 मध्ये घडली होती, परंतु आता न्यायालयाने स्पा मालकाला महिलेला 70,000 रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. चंदन नगर येथील रहिवासी असलेली ही महिला तुलसी नगर येथील स्थानिक स्पामध्ये प्रीमियम ब्राझिलियन (बिकिनी) वॅक्सिंगसाठी गेली होती. या वॅक्सिंगची किंमत साधारण 4,500 रुपये होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेचे म्हणणे आहे की जेव्हा वॅक्सिंगची प्रक्रिया सुरु झाली, तेव्हा तिने स्पा कर्मचाऱ्याकडे तक्रार केली की वॅक्स खूप गरम आहे आणि त्यामुळे तिच्या त्वेचेची जळजळ होत आहे. मात्र कर्मचाऱ्याने तिला आश्वासन दिले की ही गोष्ट सामान्य आहे आणि तिला जळजळ होणार नाही. याशिवाय स्पा मालकाने असेही सांगितले की, जननेंद्रियाचा भाग संवेदनशील आहे आणि ते अत्यंत सावधगिरीने ही वॅक्सिंगची प्रक्रिया पार पाडतील.
आश्वासन दिल्यानंतरही चुकीच्या पद्धतीने वॅक्सिंग झाले आणि त्यामुळे महिलेची त्वचा सोलवटून निघाली. ज्यामुळे महिलेच्या त्वचेची प्रचंड जळजळही झाली. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये महिलेने स्पा मालकाला त्याने दिलेल्या खराब सेवेसाठी कोर्टात खेचले. तेथे मालकाने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. पुढे 14 एप्रिल रोजी कोर्टाच्या लक्षात आले की, वॅक्सिंग सत्रादरम्यान महिलेला गंभीर दुखापत झाली होती. यावर न्यायाधीशांनी सांगितले की, स्पाने सर्व खबरदारी घ्यायला हवी होती, मात्र तसे घडले नाही. (हेही वाचा: Income Tax Notices To People: 8 हजार लोकांना आयकर विभागाची नोटीस; कर वाचवण्यासाठी केलं 'हे' काम)
न्यायाधीशांनी पुढे असेही म्हटले की, सर्व्हिस प्रोव्हायडरने महिलेच्या समस्या ऐकायला हव्या होत्या आणि आधी ग्राहकाच्या त्वचेवर वॅक्सिंगची चाचणी घेतल्यानंतरच वॅक्सिंग सेशन सुरू करायला हवे होते, परंतु तसे घडले नाही. त्यानंतर न्यायालयाने स्पाला महिलेच्या त्वचेचे नुकसान केल्याबद्दल 30,000 रुपये, मानसिक त्रास दिल्याबद्दल 20,000 रुपये आणि महिलेच्या वैद्यकीय उपचारासाठी 20,000 रुपये देण्याचे आदेश दिले. न्यायालयाने स्पा मालकाला ३० दिवसांच्या आत रक्कम भरण्यास सांगितले आहे.