बिहारच्या (Bihar) सिवान येथील लग्नाचे एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. या ठिकाणी एका विवाहित, मुले असणाऱ्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीशी लग्न केले आहे. मुलीची आई कर्जाचे पैसे परत करू न शकल्याने या आरोपी व्यक्तीने अल्पवयीन मुलीला आपल्याजवळ ठेऊन घेतले. त्यानंतर त्याने मुलीच्या भांगात कुंकू भरले व तिला पत्नी म्हणून घरात डांबून ठेवले, असा आरोप आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला रडत रडत सांगत आहे की, तिच्या 11 वर्षाच्या मुलीला एका विवाहित व्यक्तीने घरात डांबून ठेवले आहे तसेच तिच्याशी लग्न केले आहे. महिलेचा आरोप आहे की, तिने त्या व्यक्तीकडून काही पैसे घेतले होते मात्र ती हे कर्ज फेडू शकली नाही. त्या बदल्यात त्याने या मुलीला आपल्याजवळ ठेऊन घेतले. आरोपीने सांगितले की तो मुलीला पुढे शिकवेल मात्र त्याने नंतर तिच्याशी लग्न केले. आता मुलगीही परत येण्यास नकार देत आहे.
आरोपी महेंद्र पांडे याचे वय जवळजवळ 40 वर्षे आहे तर मुलगी 11 वर्षांची असून ती सहावीमध्ये शिकते. आरोपीचे म्हणणे आहे की, कुटुंबाची परिस्थिती ठीक नसल्याने त्याने मुलीला पुढे शिक्षण देण्यासाठी आपल्या घरी आणले होते. परंतु त्याने तिच्याशी लग्न केले आहे. आरोपी महेंद्र पांडे याने असेही सांगितले की, मुलीने तिचे वय 16 सांगितले होते. आता तिला तिच्या घरी परत जायचे नाही. त्याला मुलीचे भले करायचे आहे व त्यासाठी तो तिला वसतिगृहात ठेवायलाही तयार आहे. याचा संपूर्ण खर्च तो उचलणार असल्याचेही त्याने सांगितले. (हेही वाचा: Unique Love Story: अविवाहित तरुणाच्या प्रेमात पडली 10 मुलांची आई; गावकऱ्यांनी मंदिरात लावले लग्न)
या संपूर्ण प्रकरणावर मुलीची चौकशी केली असता तिने अनेकवेळा आपले निवेदन बदलले. कधी तिने कर्ज देण्याचे मान्य केले तर कधी ती नाकारत राहिली. आरोपीच्या पहिल्या पत्नीने सांगितले की, दोघांनीही स्वतःच्या इच्छेने लग्न केले आहे. ट्विटरवर ही बाब उघडकीस येताच, एसपी सिवन यांना बिहार पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून टॅग करण्यात आले आणि पुढील तपासाचे निर्देश देण्यात आले.