बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड)चे प्रमुख नीतीश कुमार (Nitish Kumar) यांना विरोधी पक्ष इंडिया ब्लॉकने (INDIA Bloc) आघाडीत आणण्यासाठी जोरदार प्रयत्नकेले होते. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काँग्रेसकडून त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली होती. परंतू, नीतीश कुमार यांनी ती नाकारली, असा दावा JD(U) नेते केसी त्यागी यांनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. दरम्यान, त्यागी यांनी केलेला दावा काँग्रेस पक्षाने फेटाळून लावला आहे. दुसऱ्या बाजूला नीतीश कुमार यांनी आपण एनडीए सोबत असल्याचे सांगत भाजप नेते नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबाही दर्शवला आहे.
आम्ही NDA सोबत ठाम- जदयु
केसी त्यागी यांनी आज तक/इंडिया टुडे टीव्हीला शनिवारी दिलेल्या खास मुलाखतीत काँग्रसकडून नीतीश कुमार यांना देण्यात आलेल्या ऑफरबद्दल दावा करण्यात आला आहे. त्यागी यांनी म्हटले आहे की, "नितीश कुमार यांना इंडिया आघाडीकडून पंतप्रधान बनण्याची ऑफर मिळाली होती. ही ऑफर अशा व्यक्तींकडून आली होती ज्यांनी त्यांना इंडिया ब्लॉकचे संयोजक म्हणून निवड होण्यापासून रोखले होते. त्यांनी ही ऑफर नाकारली आणि आम्ही NDA सोबत ठाम आहोत," त्यागी म्हणाले. (हेही वाचा, नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभाचे निमंत्रण 'INDIA' आघाडीला मिळाले नाही, काँग्रेस म्हणाली- निमंत्रण दिल्यास विचार करू)
काँग्रेसकडून खंडण
दरम्यान, काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी पंतप्रधानपदासाठी कुमार यांच्याशी इंडिया आघाडीकडून कोणीही आणि कोणताही संपर्क करण्यात आला नसल्याचे म्हटले आहे. तसा संपर्क केल्याची कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. त्यामुळे त्यागी यांनी केलेल्या दाव्याबद्दल केवळ त्यांनाच माहिती असल्याचेही वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (हेही वाचा, Congress Dhanyawaad Yatra: उत्तर प्रदेशातील नेत्रदीपक कामगिरीनंतर काँग्रेसकडून राज्यात 11 ते 15 जून दरम्यान 'धन्यवाद यात्रा' जाहीर)
भाजपला कुबड्यांची गरज
केंद्र सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसा पाठिंबा गोळा करण्यासाठी इंडिया गट JD(U) आणि तेलुगु देसम पार्टी (TDP), भाजपच्या नेतृत्वाखालील NDA च्या दोन्ही मित्रपक्षांशी संपर्क साधत असल्याच्या कयासांच्या दरम्यान त्यागी यांचा दावा पुढे आला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजांना झुगारून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 234 जागांवर विजय मिळवून इंडिया आघाडीने जोरदार कामगिरी केली. एनडीएला मात्र 293 जागा मिळाल्या, एकट्या भाजपने 240 जागा मिळवल्या, त्यांना बहुमताच्या आकड्यापेक्षा 32 कमी पडल्या आहेत. त्यामुळे भाजपला मित्रपक्षांच्या जीवावरच राजकारण करावे लागणार आहे. (हेही वाचा, Narendra Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदी 9 जून रोजी संध्याकाळी 7.15 वाजता घेणार पंतप्रधानपदाची शपथ; देश-विदेशातील अनेक मान्यवरांना आमंत्रण, जाणून घ्या यादी)
त्यागी यांच्याकडून नाव गुलदस्त्यात
कोणत्या नेत्यांनी कुमार यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली याबाबत अधिक जोर देऊन विचारले असता, त्यागी यांनी कोणाचेही नाव घेण्यास नकार दिला. "काही नेत्यांना थेट नितीश कुमार यांच्याकडे ऑफर द्यायची होती. पण त्यांना आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांना मिळालेल्या वागणुकीनंतर आम्ही इंडिया ब्लॉक सोडला. आम्ही एनडीएमध्ये सामील झालो आहोत आणि आता मागे वळून पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असे ते पुढे म्हणाले.
नितीश कुमार राजकीय धरसोड वृत्तीसाठी प्रसिद्ध
नितीश कुमार हे त्यांच्या वारंवार राजकीय आघाड्या मोडण्या आणि बदलण्यासाठी ओळखले जातात. ते इंडिया आघाडीचे शिल्पकार होते आणि त्यांनी गेल्या वर्षी पाटणा येथे पहिली बैठक घेतली होती. त्यांनी विरोधी आघाडी सोडली आणि जानेवारी 2024 मध्ये एनडीएमध्ये परतले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत JD(U) ने 12 जागा जिंकल्या असूनही, कुमार शुक्रवारी NDA संसदीय बैठकीत उपस्थित होते, जिथे नरेंद्र मोदी यांची NDA संसदीय पक्ष नेते म्हणून निवड करण्यात आली.
कुमार यांच्या राजकीय प्रवासात अनेक यू-टर्न आले आहेत. 2013 मध्ये त्यांनी राजद आणि काँग्रेससोबत युती करण्यासाठी भाजपशी संबंध तोडले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर, 2020 मध्ये त्यांनी पुन्हा भाजपसोबत जात एनडीएमध्ये प्रवेश केला आणि मुख्यमंत्री बनले. दोन वर्षांनंतर त्यांनी पुन्हा भाजपशी संबंध तोडून राजद आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. या वर्षी जानेवारीत ते पुन्हा एकदा एनडीएमध्ये गेले आणि त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची भूमिका स्वीकारली.