Bihar Assembly Election 2020: मुलींवर नव्हता विश्वास, जन्माला घातली 9-9 मुले; नीतीश कुमार यांची जीभ घसरली, नाव न घेता लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका
Nitish Kumar | (Photo Credits: Facebook)

बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) साठी प्रचार ऐन रंगात आला आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशा वेळी निवडणूक प्रचारादरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांची जिभ पुन्हा एकदा घसरली आहे. राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal) अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे नाव न घेता टीका करताना नितीश कुमार म्हणाले, 'यांचा मुलींवर विश्वास नाही. म्हणूनच 8-9 मुले जन्माला घातली. अनेक मुली झाल्या मग कुठे मुलगा जन्माला आला. हाच यांचा आदर्श. असे घडले तर बिहारची अवस्था काय होईल? कोणी वालीही उरणार नाही', असेही नितीश कुमार यांनी यावेळी म्हटले. निवडणूक प्रचारादरम्यान, एका सभेत ते बोलत होते. नितीश यांच्या टीकेला तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी प्रत्युत्तर दिले आहे

दरम्यान, नितीश कुमार नेमके कोणत्या सभेत बोलले याबाबत माहिती मिळू शकली नाही. परंतू, या सभेतील नितीश यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नितीश कुमार या भाषणात बोलताना दिसत आहे की, 'आम्ही निश्चीत केले आहे की, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उच्चमाध्यमिक विद्यालय उभारण्यात येईल. ज्यामध्ये राज्यातील सर्व मुली कमीत कमी इयत्ता 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतील. या मुली शिकल्या तरच प्रजनन दर आपोआप कमी येईल. 8-8, 9-9 इथे तर मुले-मुली जन्माला घालत राहतात. कोणाला काय माहित आहे.'

नीतीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांचे नाव न घेता टीका करत म्हटले की, यांचा मुलींवर विश्वास नाही. यांना अनेक मुली झाल्या. त्यानंतर मग मुलगा झाला. आज तुम्ही विचार करायला पाहीजे की, तुम्हाला कसला बिहार बनवायचा आहे. या लोकांचा आदर्श काय आहे हेही समजून घ्या. यांच्या आदर्शानुसार जर बिहार बनला तर किती वाईट स्थिती निर्माण होईल केवळ कल्पना करा. सर्व काही बर्बाद होईल. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी आलो आहोत. आम्ही प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने पाहतो, असेही नीतीश कुमार या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: भाजपला धक्का, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी कोरोना व्हायरस संक्रमित)

दरम्यान, नीतीश कुमार यांच्या टीकेला तेजस्वी यादव यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे की, नीतीश कुमार हे माझ्यावर टीकेसाठी जे काही बोलतात तो माझ्यासाठी एक आशीर्वादच आहे. कारण, नीतीश कुमार आता शरीराने आणि मनानेही थकले आहेत. त्यामुळे मी बिहारची निवडणूक रोजगार, नोकरी आणि विकास या मुद्द्यावरच लढणार आहे.