Telangana Tunnel Collapse (फोटो सौजन्य -X/@jsuryareddy)

Telangana Tunnel Rescue Update: तेलंगणा बोगदा दुर्घटनेच्या (Telangana Tunnel Collapse) 16 दिवसांनंतर, बचाव पथकाला बोगद्यात अडकलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडला असून या कामगाराची ओळख पटवणे देखील कठीण झाले आहे. आता, अधिकारी मृताच्या वैयक्तिक वस्तूंवरून त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही घटना 22 फेब्रुवारी रोजी घडली होती. एसएलबीसी बोगद्याचे (SLBC Tunnel) छत अचानक कोसळल्याने आठ कामगार आत अडकले होते. घटनेच्या वेळी, दोन कामगार बोअरिंग मशीन चालवत होते, तर उर्वरित सहा कामगार त्यांना मदत करत होते. अपघातात बेपत्ता झालेल्या कामगारांची नावे सनी सिंग, गुरप्रीत सिंग, मनोज कुमार, श्रीनिवास, संदीप साहू, संतोष साहू, अनुज साहू आणि जगथ खेश अशी आहेत.

बचाव पथकाला तब्बल 16 दिवसांनी सापडला मृतदेह -

बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्यासह 300 हून अधिक बचाव कर्मचारी सतत काम करत आहेत. परंतु चिखल, ढिगारा आणि सतत पाण्याची गळती यामुळे मदतकार्य अत्यंत कठीण झाले आहे. तथापि, बोगद्याच्या आत जाणारा मार्ग खूपच अरुंद आणि धोकादायक झाला आहे, त्यामुळे बचाव पथकाला अडचणी येत आहेत. आतापर्यंत कामगारांपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही, परंतु मदतकार्य वेगाने सुरू आहे. (हेही वाचा - Telangana Tunnel Collapse: तेलंगणात मोठी दुर्घटना! SLBC बोगद्याच्या छताचा काही भाग कोसळला; 6 कामगार अडकल्याची भीती)

दरम्यान, अपघातानंतर, कामगारांचे कुटुंब अत्यंत चिंतेत असून त्यांच्या सुरक्षित परतीची सतत आशा बाळगत आहेत. अपघाताला 16 दिवस उलटून गेले असले तरी, अद्याप कोणतेही ठोस यश न मिळाल्याने कुटुंबातील सदस्यांची चिंता आणि संताप वाढत आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बचाव कार्य आणखी तीव्र करण्यात येत आहे. बोगद्यातील पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी आणि कचरा काढण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मृतदेह सापडल्यानंतर उर्वरित कामगारांचा शोध तीव्र करण्यात आला आहे. तत्पूर्वी तेलंगणा सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच सरकारकडून पीडित कुटुंबांना मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. आता सर्वांच्या नजरा उर्वरित बेपत्ता कामगारांना वाचवण्याच्या मोहिमेवर लागल्या आहेत.