CAA हिंसाचाराविषयी मोठा खुलासा; दंगल घडवण्यासाठी 120 कोटींपेक्षा जास्त खर्च? इस्लामिक अतिरेकी संघटनेच हात असल्याचा संशय
Police personnel in Uttar Pradesh during anti-CAA protest (Photo Credits: IANS)

नागरिकता दुरुस्ती कायद्याला (CAA) विरोध दर्शविण्याच्या नावाखाली, देशभरातील हिंसाचाराबद्दल बरेच खुलासे झाले आहेत. याआधी हा देश आणि घटना वाचविण्यासाठी आपण निदर्शने करीत आहेत, असे म्हणणाऱ्या लोकांचे खरे रूप समोर आले आहे. आता सीएए विरोधातील जाळपोळ, तोडफोड, धरणे यांच्या मागे पीएफआय (PFI) असल्याचे समजते. महत्वाचे म्हणजे दंगल घडवण्यासाठी सुमारे 120 कोटी रुपये खर्च केल्याचेही तपासात समोर आले आहे.

मीडिया सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या गदारोळाच्या मागे असे नेटवर्क आहे, जे निदर्शकांना थेट पैसे पुरवत आहे. दिल्ली, लखनऊ, अलिगड, शामली, मेरठ, बुलंदशहर, हापूर, बिजनौर, मुजफ्फरनगर, कानपूर आणि रामपूर या ठिकाणी घडलेल्या घटनांमागील स्फोटक सत्य पोलिसांच्या अहवालातून उघड झाले आहे.

उत्तर प्रदेशात दंगलीत पीएफआयविरुद्ध पुष्कळ पुरावे पोलिसांना सापडले आहेत. या संघटनेचे पूर्ण नाव पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया असे असून, ती एक अतिरेकी इस्लामिक संघटना असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंतच्या तपासणीत पीएफआयची 73 बँक खाती सापडली आहेत, ज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या नावावर 27 बँक खाती उघडली गेली आहेत. पीएफआयशी संबंधित संस्था रिहॅब इंडिया फाउंडेशनची 9 बँक खाती आहेत आणि त्याच संस्थेने 17 वेगवेगळे लोक आणि संस्थेच्या नावे 37 बँक खाती उघडली आहेत. या 73 बँक खात्यांमधील व्यवहारांच्या तपासणीत ही मोठी बाब उघड झाली. तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी, सुमारे 120 कोटी रुपये या 73 खात्यात जमा झाले होते.

सीएए 4 डिसेंबर 2019 रोजी संसदेत सादर झाले आणि त्यानंतर पीएफआयशी संबंधित 15 खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा करण्यास सुरवात झाली. हे पैसे कोण ठेवत आहे हे गुप्त राहण्यासाठी, एकावेळी 5000 किंवा 49000 जमा करण्यात आले. ज्यांनी पैसे जमा केले त्यांना एका वेळी 50 हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम जमा करण्याची सूचना देण्यात आली होती. (हेही वाचा: CAA, NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)

दंगली होण्यापूर्वी आणि दंगलीच्या दिवशी वेगवेगळ्या शहरांमधून या खात्यांमधून वारंवार दोन हजार, पाच हजार रुपये काढून घेण्यात आले. कधी 80 वेळा तर कधी दिवसातून 90 वेळा रक्कम काढून घेण्यात आली. पीएफआयच्या 15 बँक खात्यांमधील व्यवहारांच्या तारखा हिंसाचाराच्या तारखांशीही जुळत आहेत. अशा प्रकारे या दंगलीत इस्लामिक अतिरेकी संघटना म्हणजेच पीएफआयने महत्वाची भूमिका बजावली आहे.