 
                                                                 कर्नाटकात (Karnataka) हिजाब घालण्यावरून सुरू झालेल्या वादानंतर आता ख्रिश्चनांचा पवित्र धर्मग्रंथ बायबलवरून (Bible) नवे युद्ध सुरू झाले आहे. बेंगळुरू येथील एका शाळेने विद्यार्थ्यांना शाळेत बायबल घेऊन येणे बंधनकारक केले आहे. यावर उजव्या विचारसरणीच्या गटांनी नाराजी व्यक्त केली आहे. क्लेरेन्स स्कूलने पालकांकडून त्यांच्या सहीचे प्रतिज्ञापत्र घेतले असून ज्यामध्ये नमूद केले आहे की, ‘विद्यार्थ्यांना बायबल किंवा हिमचे पुस्तक (स्तोत्र) शाळेत नेण्यास आमची हरकत नाही.’ यावरून शाळा प्रशासन बिगर ख्रिश्चन विद्यार्थ्यांना बायबल वाचण्यास भाग पाडत असल्याचा आरोप हिंदू संघटना करत आहेत.
शाळेच्या या नवीन निर्देशावर उजव्या विचारसरणीच्या गटांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत, ज्यांनी हे कर्नाटक शिक्षण कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांवर त्यांच्या इच्छेविरुद्ध धार्मिक शिक्षण लादले जात असल्याचा आरोप गटाने केला आहे. शाळेवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदू जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते मोहन गौडा यांनी दावा केला आहे की, शाळा गैर-ख्रिश्चन विद्यार्थ्यांना बायबल वाचण्यास भाग पाडत आहे. (हेही वाचा: Crime: बालविवाहाच्या तीन घटना उघडकीस, पोलिसांना माहिती मिळताच गुन्हा दाखल)
यावर शाळा प्रशासनाने आपल्या भूमिकेचा बचाव केला आहे आणि असे म्हटले आहे की, ते बायबलवर आधारीत शिक्षण देत आहेत. अलीकडेच, कर्नाटक सरकारने शाळांमध्ये शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता समाविष्ट करण्याची योजना जाहीर केली होती. शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय चर्चेनंतर घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बीसी नागेश म्हणाले, 'भगवद्गीता अनेक वर्षांपासून या देशातील लोकांनी वाचली आहे. गीता सर्व लोक वाचतात आणि जगभरातील सर्व भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर केले जात आहे. आम्ही प्रथम शिक्षणतज्ज्ञ आणि तज्ज्ञांशी चर्चा करू आणि त्यानंतर व भगवद्गीतेचा अभ्यासक्रमात समावेश करायचा का नाही याचा निर्णय घेऊ.’
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
