लहान बाळाचा मृत्यू (File Image)

कोटा विभागातील बारन (Baran) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अटरू पोलीस स्टेशन परिसरात पती-पत्नीच्या भांडणात त्यांच्या 6 महिन्यांच्या निष्पाप मुलीचा मृत्यू झाला आहे. भांडणादरम्यान संतप्त पतीने आपल्या मुलीला रस्त्यावर आपटून तिची निर्घृण हत्या केली. या बाळाला जमिनीवर आपटल्याने तिची हाडे तुटली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या संदर्भात पत्नीने मुलीच्या हत्येप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यावरून पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत.

अटरू थानाप्रभारी रामकिशन गोदारा यांनी सांगितले की, निष्पाप मुलीच्या हत्येची घटना पोलीस स्टेशन परिसरातील अरण्या गावात मंगळवारी संध्याकाळी घडली. मुलीची हत्या करणारा आरोपी पवन सहारियाचे सोमवारी पत्नी सीमासोबत भांडण झाले. यावर त्याने भांडणानंतर आपल्या पत्नीला तिच्या माहेरी जबरदस्तीने धाडले. पत्नी माहेरी जात असताना पवनने त्यांची 6 महिन्यांची मुलगी आरुषीला आपल्याजवळ ठेऊन घेतले.

त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सीमा आपल्या मुलीला घेण्यासाठी सासरी परत आली. या दरम्यान पुन्हा पती-पत्नीमध्ये काहीतरी बिनसले व वाद सुरु झाला. या वादाच्या रागातून पवनने सीमाच्या कडेवर असलेल्या आपल्या 6 महिन्यांचा मुलीला हिसकावून घेतले व तिला जमिनीवर आपटले. त्याने मुलीला रस्त्यावर इतक्या जोरात आपटले की, तिच्या डोक्याची हाडे तुटली. यामुळे निष्पाप आरुषीचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा: आईचे बिघडले मानसिक संतुलन, मुलाने केली हत्या; गुन्हा दाखल करत पोलिसांनी घातल्या बेड्या

दरम्यान, कोणीतरी पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर रात्री उशिरा पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला व आरोपीला पकडले. मुलीचा मृतदेह नंतर स्थानिक रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला. आज त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.