Bank Fraud Case: दिल्लीच्या Amira Pure Foods Pvt Ltd ने केली विविध बँकांची 1200 कोटींची फसवणूक; CBI ने दाखल केला FIR
fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

सीबीआयने (CBI) आज दिल्लीतील अमीरा प्युअर फूड्स प्रायव्हेट लिमिटेड (Amira Pure Foods Pvt.Ltd.) आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. यात कंपनीचे प्रवर्तक करण चनाना आणि मॅनेजिंग डायरेक्टर रोजश अरोरा यांचेही नावही सामील आहे. कंपनी आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी कॅनरा बँकेसह 12 बँकांची 1,200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून सीबीआयने एफआयआर नोंदविला आणि त्यानंतर दिल्ली-एनसीआरच्या 8 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. आता या प्रकरणी भ्रष्टाचार आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफआयआरमध्ये एमडी राजेश अरोरा, करण चनाना, अपर्णा पुरी आणि जवाहर कपूर, अनिता डियांग आणि वित्त प्रमुख अक्षय श्रीवास्तव यांची नावे आहेत. ही कंपनी 27 वर्षे जुनी असून, ती बासमतीसह विविध प्रकारच्या तांदळाची निर्यात करते. गेल्यावर्षी 22 मे रोजी फोरेंसिक ऑडिटमध्ये फसवणूकीचे हे प्रकरण समोर आले होते. अहवालात असे म्हटले आहे की, या आरोपींनी खात्यात फेरबदल केले आणि बँकेतून निधी मिळविण्यासाठी कागदपत्रांची फेरफार केली.

मात्र, आता आरोपी देश सोडून पळून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी सीबीआयने शोध घेतला असता कंपनीच्या संचालकांचा ठावठिकाणा मिळू शकला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआय आरोपींच्या प्रत्यर्पणासाठी आवश्यक पावले उचलत असताना, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (National Company Law Tribunal) अमीरा शुद्ध फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. (हेही वाचा: लाचखोरीच्या बाबतीत भारत आशियामध्ये पहिल्या स्थानावर; मालदीव आणि जपानमध्ये लाच घेण्याचे प्रमाण सर्वात कमी)

सीबीआयच्या तक्रारीनुसार अमीरा प्युअर फुड्स प्रायव्हेट लिमिटेडने कॅनरा बँकेची 197 कोटी, बँक ऑफ बडोदाची 180 कोटी, पंजाब नॅशनल बँकेची 260 कोटी, बँक ऑफ इंडियाची 147 कोटी, स्टेट बँक ऑफ इंडियाची 112 कोटी, येस बँकेची 99 कोटी, आयसीआयसीआय बँकेची 75 कोटी, इंडियन ओव्हरसीज बँकेची 64 कोटी, आयडीबीआयची 47 कोटी आणि विजया बँकेची 22 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.