निवांत झोप लागावी म्हणून पुरुषांनी केली कुंभकर्णाची पूजा, भर रस्त्यात झाले निद्राधीन (वाचा सविस्तर)
Kumbhkarna (Photo Credits: Wikimedia Commons)

बंगळुरू: आज देशभरात दसऱ्या निमित्त रावण दहनाचा (Ravan Dahan) कार्यक्रम आयोजि करण्यात आला आहे, तर दुसरीकडे बंगळुरू (Bangalore) मध्ये रावणाचा भाऊ कुंभकर्णाची (Kumbhkarna) पूजा केली जात आहे. आता यामागे काही धार्मिक कारण आहे असा विचार करत असाल तर थांबा.. ही पूजा करण्यामागे एक भलतंच कारण आहे. वास्तविक देशभरात काही प्रसंगात पुरुषांवर खोटे आरोप करून काही महिला त्यांना मिळालेल्या हक्कांचा गैरवापर करत असल्याचे काही दिवसांपासून समोर येत आहे. यामुळे घाबरून गेलेल्या पुरुष वर्गाची झोपच उडाली आहे आणि ही झोप परत मिळावी म्ह्णून त्यांनी चक्क कुंभकर्णाची पूजा मांडली आहे. यांनतर लगेचच भर रस्त्यात एका फुटपाथवर कागद अंथरून ही पूजा करणारी मंडळी निद्राधीन झाली होती.

माध्यमातील वृत्तानुसार, जयानगर येथील टी ब्लॉकमध्ये सेव इंडियन फॅमेली फाऊंडेशनच्या (एसआयएफएफ) वतीने कुंभकर्ण पुजेचे आयोजन करण्यात आले होते. या पुजेमध्ये सहभागी झालेल्या पुरुषांनी कुंभकर्णाच्या चित्राची पुजा केली. ‘भारतामध्ये पुरुषांच्या हक्कांबद्दल बोलणारी व्यवस्था अस्तित्वात नाही, आणि न्यायव्यस्थेचे काम फारच संथ आहे. अलीकडे जरा काही झालं किंवा झालं नाही तरी स्त्रीयांची बाजू घेतली जाते, याशिवाय घरगुती हिंसाचार, घटस्फोटानंतर मुलांचा ताबा मिळवणे, यासर्व गोष्टींचा निषेध म्ह्णून ही पूजा घालण्याचे ठरवले आहे असे यातीलच काही मंडळींनी सांगितले.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे मानसिक तणाव येऊन झोप लागत नाही असा सुद्धा दावा या पुजारी पुरुषांनी केला.तसेच खोट्या तक्रारी दाखल करुन अडकवण्यात आलेल्या व यामुळे घाबरून गेलेल्या पुरुषांना निद्रानाशापासून सुटका मिळावी म्ह्णून कुंभकर्णाची पूजा केली आहे. कुंभकर्ण याला झोप प्रिय होती तो 6 महिने झोपायचा तशीच झोप निदान आम्हाला 8 तास तरी मिळावी अशी आशा व्यक्त करत या पुरुषांनी भर रस्त्यात पूजा मांडली होती.