आसाममधील हिंदूंना Bajrang Dal ची धमकी; Christmas साजरा करण्यासाठी चर्चला भेट दिली तर मारहाण केली जाईल
Bajrang Dal leader Mithu Nath (Photo Credits: Video Grab)

गणपती झाली, नवरात्र, दिवाळी, छटपूजाही झाली. आता वेध लागले आहेत ते वर्षातील शेवटचा सर्वात एक मोठा सण नाताळ म्हणजेच ख्रिसमसचे (Christmas). काही ठिकाणी याची तयारीही सुरु झाली असल्याचे दिसत आहे. सध्या नाताळ हा सण फक्त ख्रिश्चन बांधवांच्यापुरताच मर्यादित राहिला नाही तर, इतर धर्माचे लोकही या काळात चर्चला (Churches) भेट देतात. आता आसामच्या (Assam) कछार (Cachar) जिल्ह्यातील उजव्या-गटाच्या बजरंग दलाच्या (Bajrang Dal) नेत्याने हिंदूंना ख्रिसमसच्या उत्सवात चर्चांना भेट न देण्याचा इशारा दिला आहे. एका कार्यक्रमात बोलताना विश्व हिंदू परिषदेच्या (बजरंग दलाची मूळ संस्था) जिल्हा संघटनेचे सरचिटणीस मिथू नाथ (Mithu Nath) म्हणाले की, ख्रिसमसच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी हिंदूंनी चर्चांना भेटी दिल्या तर त्यांना मारहाण केली जाईल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा तुकडीचे सरचिटणीस मिथू नाथ यांनी ख्रिश्चन बहुसंख्य मेघालयाची राजधानी असलेल्या शिलांगमधील विवेकानंद केंद्र बंद केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मिथू नाथ म्हणाले की, ख्रिसमसच्या दिवशी हिंदूंना कार्यक्रम आणि उत्सवांमध्ये भाग घेता येणार नाही. यावेळी मिथू नाथ यांनी लोकांना सावध केले की, चर्चमध्ये जाणाऱ्या हिंदूंना मारहाण केली जाईल. (हेही वाचा: रहस्यमय आजारामुळे Andhra Pradesh मधील 200 हून अधिक लोक आजारी; कारण शोधण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न, तपासणीसाठी पाठवले रक्ताचे नमुने)

ते पुढे म्हणाले की, ज्यांनी आमची तीर्थेस्थाने बंद केली त्यांच्या ख्रिसमस उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या तसेच चर्चेसला भेट देणाऱ्या हिंदूंची मी टीका करतो. ख्रिसमसमध्ये कोणताही हिंदू चर्चमध्ये जाणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. मिथू नाथ म्हणाले, आम्हाला ठाऊक आहे की जर आम्ही असे काही कृत्य केले तर नक्कीच आमच्याबाबत वृत्तपत्रांमध्ये छापून येईल. गुंडा दलने ओरिएंटल स्कूलमध्ये तोडफोड केली पण हे आमचे प्राधान्य नाही. जोपर्यंत शिलॉंगमधील मंदिरांवर कुलूप लावलेले आहे तोपर्यंत ख्रिसमसच्या वेळी हिंदूंना ख्रिश्चन बांधवांच्या कार्यक्रमात भाग घेता येणार नाही.