Mysterious Disease: रहस्यमय आजारामुळे Andhra Pradesh मधील 200 हून अधिक लोक आजारी; कारण शोधण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न, तपासणीसाठी पाठवले रक्ताचे नमुने
Healthcare worker (Photo Credits: IANS)

सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढत आहे. एकीकडे लस येण्याची उत्सुकता आहे तर दुसरीकडे इतर काही आजार डोके वर काढत असलेले दिसत आहेत. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एलूरु (Eluru) भागात 225 हून अधिक लोक एकत्र आजारी पडले आहेत. यामध्ये अनेक मुलांचाही समावेश आहे. यामुळे एलूरु शहरातील डॉक्टर आणि आरोग्यसेविका यांची शनिवारी फारच धावपळ झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना फिट आणि मळमळ होण्याची लक्षणे दिसल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र हे नक्की कशामुळे घडले याबाबत अजूनतरी काही ठोस माहिती मिळू शकली नाही.

अधिकाऱ्यांच्या असा विश्वास आहे की, हे खराब पाण्यामुळे होऊ शकते. मात्र, त्यांनी व्हायरल एन्सेफलायटीस होण्याची शक्यताही नाकारली नाही. हे सर्व रुग्ण नंतर ठीक झाले परंतु अधिकाऱ्यांनी याला एक रहस्यमय आजार म्हटलेले आहे. आजारी लोकांपैकी 70 जणांना आतापर्यंत सुट्टी देण्यात आली आहे, तर 76 महिला आणि 46 मुले अद्याप रुग्णालयात दाखल आहेत.

बेशुद्ध पडण्यापूर्वी सर्व रुग्णांनी वेदना, डोकेदुखी, मळमळ आणि फिटची लक्षणे असल्याची तक्रार केली होती. परंतु 10-15 मिनिटांत ते बरेही झाले होते. अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या रक्ताचे नमुने गोळा करून रोगाचे कारण निश्चित करण्यासाठी तपासणीसाठी पाठविले आहेत. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून विजयवाडा येथे आपत्कालीन मेडिकेअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

हेल्थकेअर प्रोफेशनल्सला एकच गोष्टीचे आश्चर्य वाटत आहे की, हे सर्व रूग्ण एकमेकांशी संबंधित नव्हते आणि ते एलूरु शहरातील विविध भागांमध्ये राहत होते. तसेच ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. या घटनेनंतर आंध्र प्रदेशचे आरोग्यमंत्री अल्ला कालीकृष्ण श्रीनिवास यांनी एलूरु सरकारी रुग्णालयात भेट दिली. (हेही वाचा: सीरम इन्स्टिट्यूटचे Adar Poonawalla ठरले Asian of the Year; कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात दिले मोठे योगदान)

त्यांनी एएनआयला वृत्तसंस्थेला सांगितले की, या आजाराचे कारण शोधण्यासाठी डॉक्टर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. सर्व रुग्ण आता स्थिर आहेत. ज्या परिसरात हे लोक आजारी पडले होते त्या ठिकाणी डॉक्टरांची टीम तपासणीसाठी गेली होती. त्या भागातील प्रत्येक घरात वैद्यकीय चाचण्या घेतल्या जात आहेत. आता जिल्हा प्रशासनाने खराब पाण्याबाबत तपासणी सुरू केली आहे. यासाठी घरोघरी पाण्याची तपासणी केली जात आहे. तसेच, लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.