Baby Dhanishtha: जगाचा निरोप घेण्यापूर्वी 20 महिन्यांच्या धनिष्ठाने 5 लोकांना दिले नवीन जीवन; बनली देशातील सर्वात लहान Organ Donor
Representational Image (Photo Credits: File Photo)

कधी कधी दीर्घायुष्य लाभूनही लोक परोपकार करीत नाहीत, कोणालाही कसले दान करीत नाहीत. मात्र धनिष्ठा (Dhanishtha) नावाच्या चिमुरडीने जाता जाता पाच जणांचे प्राण वाचवले आहे. दिल्लीच्या रोहिणी भागातील 20 महिन्यांची धनिष्ठ सर्वात लहान कॅडव्हर डोनर (Cadaver Donor) ठरली आहे. या मुलीच्या मृत्यूनंतर तिचे अवयव दान केले गेले, त्यानंतर जीवन आणि मृत्यूशी झगडणाऱ्या पाच रुग्णांना नवीन जीवन मिळाले. दिल्लीतील प्रसिद्ध रुग्णालय सर गंगाराम येथे या बाळाच्या अवयवांचे पाच रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, 20 महिन्यांची धनिष्ठा 8 जानेवारी रोजी रोहिणी येथे आपल्या घरी खेळत असताना छतावरून खाली पडली, त्यानंतर तिच्या पालकांनी ताबडतोब तिला दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात नेले. यावेळी, डॉक्टरांनी धनिष्ठाला शुद्धीवर आणण्याचे बरेच प्रयत्न केले पण त्याला यश मिळू शकले नाही. शेवटी, डॉक्टरांनी 11 जानेवारीला धनिष्ठाला ब्रेन डेड म्हणून घोषित केले. अहवालानुसार, मुलीचा मेंदू डेड होता परंतु तिच्या शरीरातील इतर भाग योग्यप्रकारे कार्यरत होते. त्यानंतर धनिष्ठच्या आई-वडिलांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

धनिष्ठाचे वडील आशिष म्हणाले, 'आम्ही रुग्णालयात अनेक रूग्ण पाहिले आहेत ज्यांना अवयवदानाची अतिशय गरज आहे. आता आम्ही आमची मुलगी गमावून बसलो आहोत, म्हणून आम्हाला वाटले की तिचे अवयव दान केल्याने ते केवळ रूग्णांमध्येच राहणार नाहीत, तर त्यांचे प्राण वाचविण्यात मदत करतील.’ कुटुंबाच्या परवानगीनंतर मुलीचे हृदय, यकृत, कॉर्निया, दोन्ही मूत्रपिंड पाच वेगवेगळ्या लोकांना देण्यात आले. ज्यामुळे या लोकांना नवीन जीवन मिळू शकले. कॅडव्हर डोनर अशा व्यक्तीला म्हणतात जो शरीराचे पाच आवश्यक अवयवय दान करतो. (हेही वाचा: लॉलीपॉप आणि कँन्डी मध्ये टॅल्कम पावडरची भेसळ केली जात असल्याचा प्रकार उघडकीस)

दरम्यान, 13 मार्च 2020 पर्यंत भारतात एकूण 30,886 रुग्ण अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत. 0.26 प्रती दशलक्षच्या दराने अवयव दानाचे प्रमाण भारतात खूपच कमी आहे. अवयवदानाच्या अभावामुळे दरवर्षी सरासरी 5 लाख भारतीयांचा मृत्यू होतो.