Baby | Representational image (Photo Credits: pxhere)

राजस्थानच्या (Rajasthan) भरतपूरमध्ये (Bharatpur) एका अनोख्या बाळाचा जन्म झाला आहे. हे बाळ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या बाळाच्या हाताला आणि आणि पायाला 10 व्यतिरिक्त अतिरिक्त बोटे आहेत. ही मुलगी असून तिला एकूण 26 बोटे आहेत. अशाप्रकारे अतिशय दुर्मिळ असे हे प्रकरण समोर आले आहे. या मुलीच्या दोन्ही हातांना 7-7 बोटे आहेत आणि पायाला 6-6 बोटे आहेत. या अनोख्या मुलीला पाहून कुटुंबीयही आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे ही मुलगी पूर्णपणे निरोगी आहे.

भरतपूर जिल्ह्यातील कामा परिसरातून हे अनोखे प्रकरण समोर आले आहे. जिथे परवा रात्री 3.40 च्या सुमारास सीएचसीमध्ये सरजू देवी या गर्भवती महिलेने या अनोख्या बाळाला जन्म दिला. मुलीचे वडील गोपाल भट्टाचार्य हे सीआरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. रुग्णालयासह परिसरातही या 26 बोटांच्या अनोख्या मुलीची चर्चा आहे.

सरजू देवी यांना प्रसूती वेदना होऊ लागल्याने त्यांचे पती गोपाल यांनी त्यांना कामा येथील सीएचसी रुग्णालयात दाखल केले. जिथे रविवारी पहाटे 3.40 वाजता सरजू यांनी बाळाला जन्म दिला. यानंतर जेव्हा डॉक्टर आणि नर्सनेही मुलीला पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. त्यांच्या लक्षात आले की मुलीला इतरांपेक्षा जास्त बोटे आहेत. यावेळी नर्सने मुलीची बोटे मोजली असता ती 26 असल्याचे आढळून आली. (हेही वाचा: आग्रा मधील राजकीय बालगृहात मुलीला स्लिपरने मारल्याचा व्हीडिओ वायरल; घटनेच्या चौकशीचे आदेश)

रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, सरजू यांनी एका मुलीला जन्म दिला आहे, जिच्या हातात आणि पायात अतिरिक्त बोटे आहेत. या प्रकाराला 'पॉलीडॅक्टिली' म्हणतात. अशी प्रकरणे फार दुर्मिळ आहेत. त्यांनी सांगितले की अशी प्रकरणे अनुवांशिक विसंगतीमुळे उद्भवतात. विशेष म्हणजे बाळ आणि आई दोघेही पूर्णपणे निरोगी आहेत. मुलगी कोणत्याही प्रकारे अपंग नाही. या अनोख्या बाळाच्या जन्मानंतर तिला पाहण्यासाठी अनेक लोक हॉस्पिटलमध्ये गर्दी करत आहेत.