अयोध्येतील भव्य राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पुजारी निवडण्याची मोहीमही तीव्र झाली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 20 पुरोहितांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली होती. ज्यासाठी 3 हजार लोकांनी अर्ज केले आहेत. अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) मुख्यालय कारसेवक पुरम येथे या लोकांच्या मुलाखती होत आहेत. या 3 हजारांमधून 200 उमेदवारांची निवड करण्यात आली असून, आता यातून 20 जणांची निवड केली जाईल. या लोकांना राम मंदिराचे पुजारी बनवण्याआधी 6 महिन्यांचे प्रशिक्षणही दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, 3 सदस्यांच्या मुलाखती पॅनेलमध्ये वृंदावनचे जयकांत मिश्रा आणि अयोध्येचे दोन महंत, मिथिलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास यांचा समावेश आहे. मुलाखतीदरम्यान, उमेदवारांना पूजा प्रक्रियेशी संबंधित अनेक कठीण प्रश्न विचारण्यात आले. निवडलेल्या उमेदवारांना कारसेवकपुरममध्येच 6 महिने प्रशिक्षण दिले जाईल. त्यांच्या शिक्षणासाठी धार्मिक अभ्यासक्रमही तयार केला जाणार आहे.
निवडलेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर पुजारी म्हणून नियुक्त केले जाईल आणि त्यांना विविध पदे दिली जातील. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, ज्या उमेदवारांची निवड झाली नाही ते प्रशिक्षणात सहभागी होतील आणि त्यांना प्रमाणपत्र मिळेल. अशा उमेदवारांना भविष्यात पुजारी पदासाठी बोलावण्याचीही संधी मिळणार आहे. प्रशिक्षणाच्या वेळी, उमेदवारांना मोफत निवास आणि भोजन सुविधा मिळेल आणि 2000 रुपये देखील मिळतील. (हेही वाचा: Jobs in Hindu Temple: 'केवळ हिंदू धर्माचे पालन करणारे लोकच मंदिरात काम करण्यास पात्र आहेत'; High Court चा मोठा निर्णय)
दरम्यान, अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या रामलल्लाच्या भव्य मंदिरामधील सिंहासन बनवण्याचे कामही वेगाने सुरू आहे. गर्भगृहाच्या आत 3 फूट उंचीचे सिंहासन तयार केले जात आहे. ज्यावर रामलल्ला विराजमान होतील. येत्या जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन होणार आहे. हे मंदिर लार्सन अँड टुब्रो ग्रुपने 18,000 कोटी रुपये खर्चून बांधले आहे.