Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

एका वृद्ध पुजार्‍याची (Priest) निर्घृण हत्या केल्यानंतर अवघ्या 24 तासांत मांडवी पोलिसांनी गुन्ह्यात सहभाग असलेल्या 34 वर्षीय व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मे रोजी उसगाव तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पन्नाशीच्या आसपास असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह त्यांना सापडला होता. या मृतदेहाच्या डोक्यावर व चेहऱ्यावर खोल जखमा झाल्या होत्या. तपासामध्ये या व्यक्तीचे नाव भिवा भिक्या वायडा (Bhiwa Bhikya Waida) असे असून तो उसगाव येथील रहिवासी असल्याचे समोर आले.

त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासामध्ये त्यांनी गुन्हा घडलेल्या स्थळाजवळ असलेल्या स्विचगियर उत्पादक कंपनीच्या आवारात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यामध्ये त्यांना संशयित व्यक्ती दिसला. कंड्या महादू बसवत (Kandya Mahadu Baswat) उर्फ ​​विनोद असे संशयिताचे नाव आहे. तो मोबाईल फोन वापरत नसल्यामुळे त्याचे लोकेशन ट्रॅक करणे अक्षरशः अशक्य होते.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मार्गावरील आणखी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करणे सुरू ठेवले आणि शिरसाड गावातून विनोदला पकडण्यात यश मिळविले. काही महिन्यांपूर्वी सोडून गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी आरोपी विनोदने मृत पुजाऱ्याशी संपर्क साधला होता. मृताने काही विधी करून (जे आदिवासी समाजात सामान्य आहेत) करून विनोदच्या पत्नीला परत आणण्यास मदत करण्याची ऑफर दिली. यासाठी त्याने आरोपी विनोदकडून 2,000 रुपये घेतले. (हेही वाचा: आयआयटी मुंबई येथील दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी एसआयटीकडून आरोपपत्र दाखल)

मात्र यातून काहीही निष्पन्न न झाल्याने विनोदने मयताशी भांडण केले. या वादाला हिंसक वळण लागले त्यानंतर विनोदने भिवाचे डोके दगडाने ठेचले व त्यात त्याचा मृत्यू झाला. चौकशी दरम्यान, हे देखील समोर आले की विनोदने 2017 मध्ये एका चौकीदाराला झाडावरून आंबे तोडण्यापासून रोखण्यासाठी मारले होते. त्यानंतर 2020 मध्ये कोरोना महामारी दरम्यान आपत्कालीन पॅरोलवर त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. आता विनोदवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे.