Ayodhya Deepotsava Celebrations (Photo Credit : ANI)

आज अयोध्येत (Ayodhya) 492 वर्षानंतर रामजन्मभूमीवर भव्य दीपोत्सवाचे (Deepotsava) स्वप्न साकार होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. छोटी दिवाळीनिमित्त सीएम आदित्यनाथ योगी यांच्या नेतृत्वात हा दीपोत्सव रामाच्या अयोध्या शहरात साजरा केला जाईल. या दरम्यान शरयू काठी रामच्या पाडीच्या घाटावर पाच लाख 50 हजाराहून अधिक दिवे लावून नवीन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सीएम योगी यांनी रामलल्लासमोर दीपोत्सवाचे उद्घाटन केले. राज्यपाल आनंदीबेन पटेल देखील मुख्यमंत्री योगी यांच्यासमवेत अयोध्येत पोहोचल्या आहेत.

आज संध्याकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी अयोध्येतल्या रामजन्मभूमी स्थळावर पूजा केली. अयोध्येत दीपोत्सव कार्यक्रमासाठी रामची पाडी रांगोळी आणि दिव्यांनी सजली आहे. दीपोत्सवात 5.51 लाख दिवे प्रज्वलित केले जातील व दिवे मोजण्यासाठी घाटावर स्वयंसेवकही उभे केले आहेत. सध्या या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. जगभरातील आकर्षण आणि कुतूहलाचे केंद्र बनलेल्या अयोध्यामधील दीपोत्सवाच्या माध्यमातून योगी सरकार संपूर्ण जगाला भारताच्या सांस्कृतिक वैभवाचा संदेश देणार आहे.

यावेळी सीएम योगी आदित्यनाथ म्हणाले की, रामाची पाडी आपण केवळ अमर व निर्मळच केली नाही तर ती विस्तारित केली आहे, यंदा 5.51 लाख दिवे प्रज्वलित होत आहेत आणि पुढच्या वर्षी ही संख्या 7.51 लाखांवर नेणार आहोत. रघुनंदनाच्या स्वागतासाठी अयोध्यामध्ये संस्कृतींच्या सप्तरंगी छटा विखुरतील. गुजरातपासून ते बुंदेलखंड पर्यंतच्या 7 अनोख्या संस्कृती शरयू किनाऱ्यावर एकत्र दिसतील. दीपोत्सव विशेष करण्यासाठी योगी सरकारने गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, ब्रज आणि बुंदेलखंड येथील कलाकारांसोबत स्थानिक कलाकारांना अयोध्यामध्ये आमंत्रित केले आहे. (हेही वाचा: धनत्रयोदशीच्या पार्श्वभुमीवर मुंबई, पुणे, दिल्लीसह 'या' ठिकाणचे आजचे सोन्याचे दर जाणून घ्या)

दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहू शकत नाहीत, त्या दृष्टीने सरकारने आभासी दीपोत्सवाची वेबसाइट देखील सुरू केली आहे. या ठिकाणी कोणीही व्हर्चुअल मार्गाने दिवा लावू शकतो आणि तो रामनागरीला समर्पित करू शकतो. अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर येथील हा पहिलाच दीपोत्सव आहे.