SBI ATM Fire at Kannad City in Aurangabad । (Photo credit: Archived, edited, symbolic image)

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील कन्नड (Kannad) शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India )  शाखा कार्यालयाबाहेरील एटीएमला  (SBI ATM) आग लागली. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. तसेच, आग लागली तेव्हा एटीएममध्ये नेमकी किती रक्कम होती याचीही माहिती मिळू शकली नाही. ही घटना शुक्रवारी (23 ऑगस्ट 2019) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. आग लागल्याचे समजताच बँक व्यवस्थापण आणि स्थानिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना तातडीने या घटनेची माहिती दिली.

दरम्यान, आग लागली तरी एटीएममधील रकमेला बराच काळ काही धोका पोहोचत नाही. ही आग वेळीच आटोक्यात आणली तर, एटीएममधील रक्कम सुरक्षीत राहते, असा दावा घटनास्थळावरील काही प्रत्यक्षदर्शी करत होते. मात्र, बँक व्यवस्थापनाकडून या दाव्याला दुजोरा मिळू शकला नाही.

प्राप्त माहितीनुसार, वेळीच माहिती मिळाल्याने अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. परिणामी अग्निशमन दलाच्या जवानांनी  आग आटोक्यात आणली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. (हेही वाचा, Mumbai Fire: भिंवडी येथील चंदन पार्क परिसरात फॅक्टरीला भीषण आग; लाखोंचं नुकसान झाल्याची भीती)

आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिक आणि पादचाऱ्यांची घटनास्थळी गर्दी झाली. बघ्यांची  संख्या अधिक असल्यामुळे घटनास्थळावर गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसत होती. गर्दीबद्दल उत्सुकता वाटल्याने मग रस्त्यावरुन ये-जा करणारी वाहनेही कुतूहलापोटी घटनास्थळी थांबवली जात होती. यामुळे रस्त्यावर वाहनांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत होती.