Prashant Kishor | (Photo Credits: Facebook)

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत (Assembly Election Results 2022) भाजपने चांगली कामगिरी केली असून, या राज्यांमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. भारतीय राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी भाजपच्या या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली आहे. या विजयावर प्रशांत किशोर म्हणाले की, भारताच्या खऱ्या लढतीचे निकाल 2024 साली येतील. शुक्रवारी आपल्या ट्विटमध्ये प्रशांत किशोर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशासाठी लढा दिला जाईल असे लिहिले आहे.

प्रशांत किशोर आपल्या ट्वीटमध्ये लिहितात, ‘भारतामधील खरी लढाई 2024 मध्ये लढली जाईल आणि त्याच वर्षी त्याचा निर्णयही होईल. कोणत्याही राज्यांच्या निवडणुकीवरून देशाचा निर्णय होणार नाही. हे साहेब (पंतप्रधान) जाणतात. त्यामुळे हुशारीने एखाद्या राज्याच्या निवडणूक निकालांचा वापर करून विरोधकांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे. त्याला बळी पडू नका किंवा त्याचा हिस्साही बनू नका.’

पाचपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले होते की, या निवडणुकांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ठरवले आहेत. नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावर प्रशांत किशोर यांनी हल्लाबोल केला होता. (हेही वाचा: भाजपच्या विजयानंतर ममता बनर्जीची पहिल प्रतिक्रिया, यूपीमध्ये मतांची लूट, ईव्हीएमची फॉरेन्सिक तपासणी व्हायला हवी)

प्रशांत किशोर हे सातत्याने भाजपविरोधात मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी तृणमूल काँग्रेससाठी निवडणूक रणनीती तयार केली होती. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने प्रचंड बहुमताने विजय मिळवला. जानेवारी 2022 मध्ये तृणमूल काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, नुकत्याच झालेल्या टीएमसीच्या राज्य समितीच्या बैठकीत प्रशांत किशोर आणि ममता बॅनर्जी एकाच व्यासपीठावर दिसले. किशोर यांनी काँग्रेस हायकमांडशीही संपर्क साधला होता. मात्र, प्रकरण फार पुढे सरकले नाही.