आसाममधील (Assam) एका महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांना वर्गात अनुचित कृत्य करताना आढळून आल्याने निलंबित करण्यात आले आहे. कॉलेजच्या इयत्ता 11 व्या वर्गातील मुला-मुलींचा एक गट वर्गात एकमेकांना मिठी (Hug) मारून, एकमेकांची चेष्टा-मस्करी करत होता. त्याच वेळी वर्गातील आणखी एका विद्यार्थ्याने त्यांचा हा व्हिडिओ शूट केला आणि नंतर तो सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर महाविद्यालयाने या 7 मुलांना निलंबित केले. ही घटना सिलचरच्या रामानुज गुप्ता कॉलेज या राज्यातील खासगी संस्थेमध्ये घडली.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या अशा वर्तनावर टीका केली. काहींनी यासाठी कॉलेज प्रशासनावरही आरोप केले, त्यांना अशा कृत्यासाठी जबाबदार धरले. बुधवारी हा व्हिडिओ कॉलेज अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला आणि त्यानंतर सात विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येण्यापासून तात्काळ थांबवण्यात आले. यामध्ये सातपैकी चार मुली आणि तीन मुले आहेत.
याबाबत महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांना नोटीस बजावली व त्यात नमूद केले की, विद्यार्थी अशा अश्लील कृत्यांमध्ये स्पष्टपणे सहभागी असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांचे असे कृत्य संस्थेच्या शिस्तीचे घोर उल्लंघन करतात. त्यामुळे अशी चूक करणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात येण्यापासून अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले. (हेही वाचा: Karnataka: प्रेम प्रकरणावरून दोन गटात हाणामारी, दोघांचा मृत्यू; अनेकजण जखमी)
कॉलेजचे प्राचार्य पूर्णदीप चंदा यांनी आयएएनएसला सांगितले की, ‘जेवणाच्या सुट्टीवेळी वर्गात शिक्षक उपस्थित नसताना विद्यार्थ्यांनी हे घृणास्पद कृत्य केले. आमच्याकडे कॉलेज कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असून कॅम्पसमध्ये मोबाईल फोनला बंदी आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘हे विद्यार्थी इयत्ता 11 वी च्या नवीन बॅचचे आहेत आणि त्यांना कॉलेजमध्ये रुजू होऊन 15 दिवस झाले आहेत.’ दरम्यान, कॉलेज प्रशासनाने या सात विद्यार्थ्यांच्या पालकांनाही बोलावून घेतले आहे. घडल्या प्रकाराबाबत कॉलेज आणखी कडक कारवाई करू शकते आणि कदाचित विद्यार्थ्यांची संस्थेतून हकालपट्टीदेखील होऊ शकते, अशी माहिती आहे.