Karnataka: कर्नाटकातील कोप्पल (Koppal) जिल्ह्यात गुरुवारी आंतरधर्मीय संबंधांवरून दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले. ही घटना जिल्ह्यातील हुलिहैदर येथील असून प्रेमप्रकरणावरून दोन गटात वाद झाला. हे प्रकरण इतके वाढले की, वादाने हिंसक रूप धारण केले. या घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंसक चकमकीत वेंकाप्पा (60) आणि बाशा (22) यांचा मृत्यू झाला आणि दोन्ही गटातील किमान चार जण जखमी झाले. हाणामारी दरम्यान दोन्ही गटात लाठ्या-काठ्या, शस्त्रे घेऊन हाणामारी झाली. पोलिसांनी सांगितले की, ज्या दोन गटात हिंसक हाणामारी झाली त्यात एक गट मुस्लिम तर दुसरा गट वाल्मिकी समाजाचा आहे. (हेही वाचा - Pune: किरकोळ वादातून भोजनालयातील कर्मचाऱ्याची हत्या करुन पलायन, आरोपीस पालघरमध्ये अटक)
कनकगिरी पोलिस स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, वाल्मिकी मुलगा आणि मुस्लिम मुलगी लिव्ह-इनमध्ये होते. ते गाव सोडून गेले होते. दोघेही प्रौढ आहेत. दोघांनाही परत आणून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. परंतु, मुलीला मान्य झालं नाही आणि ती मुलाकडे परत आली. त्यानंतर दोन्ही गटातील तणाव वाढला.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही कुटुंबांमध्ये पूर्वीचा राग होता. मोहरमनिमित्त गावात पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी दोन्ही बाजूंमधील वाद वाढत जाऊन हाणामारी होऊन प्रकरणाने हिंसक रूप धारण केले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. एसपी, डेप्युटी एसपी आणि पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात आहे.