Assam: मास्क घालण्याची गरज नाही, कोरोना विषाणू निघून गेला आहे, जेव्हा तो परत येईल तेव्हा कल्पना देऊ: आरोग्यमंत्री Himanta Biswa Sarma 
Assam Minister Himanta Biswa Sarma (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरस (Coronavirus) आपल्यामध्ये कधी पर्यंत असेल हे आपणास माहित आहे? नाही. कोरोना परत गेल्यावर तो कधी परत येईल हे आपणास नाहीत आहे? नाही. ही गोष्ट अशी आहे ज्याचे उत्तर डॉक्टर व शास्त्रज्ञांनाही माहित नाही. मात्र, भाजप नेते, आसामचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांना याबाबत माहित आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत, अशात आसामचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे की, आसामच्या लोकांना कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याची गरज नाही. आसाममध्ये कोरोना व्हायरस नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सरमा यांनी शनिवारी जेव्हा हे निवेदन दिले तेव्हा देशात जवळपास 90 हजार कोरोनाची प्रकरणे समोर आली होती. इंडिया टुडेशी बोलताना भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सरमा म्हणाले की, ‘मास्क घालून लोक भीतीला खतपाणी घालत आहेत. आसाममध्ये मास्क घालण्याची गरज नाही. जेव्हा राज्यात मास्क घालण्याची गरज भासेल तेव्हा सांगितले जाईल.’ ते पुढे म्हणाले की, ‘जर आपण मास्क घातले तर ब्युटी पार्लर कसे चालतील? ब्युटी पार्लरचा व्यवसाय होणेही महत्वाचे आहे. अर्थव्यवस्था सुधारण्याचीही गरज आहे.’

केंद्र सरकार तर मास्क घालण्याचा सूचना देत आहे, असे म्हटल्यावर सरमा म्हणाले, 'केंद्राने सूचना द्याव्यात पण आसामबद्दल बोलायचे तर इथे कोरोना व्हायरस नाही. मास्क घालून उगीच घाबरून जाण्याची गरज नाही. जेव्हा कोरोना येईल तेव्हा मी सांगेन लोकांना मास्क घालायला. त्यावेळी जर मास्क घातला नाही तर 500 रुपयांचा दंड आकारला जाईल.' (हेही वाचा: कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवली उच्चस्तरीय बैठक)

दरम्यान, बीपीएफचे अध्यक्ष हाग्रमा मोहिलरी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाष्य केल्यामुळे, हेमंत बिस्वा सरमा यांना निवडणूक आयोगाने 48 तास जाहीर सभा घेण्यास, मिरवणुका घेण्यास, रॅली काढण्यासाठी, रोड शो घेण्यास बंदी घातली होती. नंतर हेमंत बिस्वा सरमा यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्यावरील लादलेली बंदी 24 तासांपर्यंत कमी केली.