ईशान्य भारतामध्ये आसाम आणि मिझोराम (Assam-Mizoram Border Violence) या राज्यांत सीमवादावरून काल (26 जुलै) पुन्हा संघर्ष पेटला आहे. दरम्यान या हिंसाचारामध्ये 6 पोलिस धारातीर्थी पडले आहेत तर 50 पोलिस जखमी आहेत. त्यामध्ये एक महाराष्ट्राचे सुपुत्र IPS वैभव निंबाळकर (Vaibhav Nimbalkar) देखील आहेत. वैभव हे मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसरचे आहेत पण सध्या ते कछार जिल्ह्याचे एसपी आहेत. कालच्या हिंसाचारामध्ये त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. वैभव यांची बहीण अभिनेत्री, युट्युबर ऊर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) हीने इंस्टावर पोस्ट करत माहिती देताना त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे. सध्या ते आयसीयू मध्ये असून लवकरच शस्त्रक्रियेद्वारा गोळी काढली जाईल असं सांगण्यात आले आहे.
दरम्यान वैभव निंबाळकर यांच्या आरोग्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रार्थाना केली आहे. त्याबाबत ट्वीट करत 'तब्येतीला लवकर आराम पडो ही सदिच्छा.लवकर बरे व्हा' असं म्हटलं आहे. वैभव निंबाळकर हे भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी म्हणून निवडले गेले होते.
खासदार सुप्रिया सुळे ट्वीट
आसाम राज्यातील कछार जिल्ह्याचे एसपी व मूळचे सणसर, ता. इंदापूर येथील वैभव चंद्रकांत निंबाळकर हे मिझोराम-आसाम सीमेवर झालेल्या गोळीबारात जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या तब्येतीला लवकर आराम पडो ही सदिच्छा.लवकर बरे व्हा. @vaibhavips09 pic.twitter.com/v5YuIFLV3H
— Supriya Sule (@supriya_sule) July 27, 2021
हर्षवर्धन पाटील ट्वीट
इंदापूर तालुक्यातील सणसरचे रहिवासी व सध्या आसाम राज्यातील कछार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक वैभव निंबाळकर हे मिझोराम-आसाम सीमेवरील गोळीबारात जखमी झाले असून ते यातून लवकरात लवकर बरे होऊन आपल्या कर्तृत्वावर रूजू व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
— Harshvardhan Patil (@Harshvardhanji) July 27, 2021
उर्मिला निंबाळकर पोस्ट
आसाम आणि मिझोराम मध्ये सीमेवरून गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांमध्ये संघर्ष सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ईशान्य भारतातील राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांची शिलॉंगमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीला 2 दिवस होण्यापूर्वीच पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आणि नागरिक एकमेकांना भिडले आहेत. काल या भागात काही शेतकर्यांच्या झोपड्यांना आग देखील लावण्यात आली आहे.