Madhapur Village (Photo Credits: X/811GK)

Asia’s Richest Village: तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत देश, शहरे, राज्ये, प्रांत यांच्याबद्दल ऐकले असेल, पण सर्वात श्रीमंत गावाबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? नाही, कारण गावाचे नाव ऐकले की प्रत्येकाला कच्ची घरे, कच्चा रस्ता, शेती, गाई, म्हशी आणि साधी गरीब माणसे दिसतात, पण आता ही वस्तुस्थिती खोटी ठरली आहे. होय, आपण खेड्यांना मागास आणि गरीब म्हणून पाहतो, मात्र हा भ्रम आता मोडला आहे. ही गावे आता प्रगतीच्या अशा वाटेवर निघाली आहेत की, मोठी शहरेही मागे पडू लागली आहेत. आता गुजरातमधील माधापर (Madhapar) हे आशियातील सर्वात श्रीमंत गाव ठरले आहे. एवढेच नाही तर या यादीत भारतातील एक नव्हे तर चार गावे आहेत.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, आशियातील सर्वात श्रीमंत गावांच्या यादीत भारतातील 4 गावे आहेत. यामध्ये माधापर, शिर्डी, पुंसारी, मिट्टीधार या गावांचा समावेश आहे. अहवालानुसार, गुजरातमधील कच्छमध्ये असलेले माधापर गाव आशियातील सर्वात श्रीमंत गाव आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या गावात फक्त 20 हजार कुटुंबे आहेत आणि त्यांच्याकडे 7000 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत, यावरून हे लोकांचे गाव किती श्रीमंत आहे हे लक्षात येते.

गावातील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे स्थानिक शाखा व्यवस्थापक म्हणाले की, मोठ्या ठेवींनी हे गाव सर्वात श्रीमंत बनले आहे. या गावात पाणी, स्वच्छता, रस्ते, तलाव, माब्न्दिरे अशा सर्व मूलभूत सुविधा आहेत. मॅनेजरने सांगितले की, इथे मातीची घरे नाहीत तर मोठे बंगले आहेत. इथे सार्वजनिक आणि खाजगी शाळादेखील आहे. या गावात 17 बँका आहेत. यामध्ये एचडीएफसी बँक, एसबीआय, पीएनबी, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि युनियन बँक यासारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक आणि खाजगी बँकांचा समावेश आहे, जे एका साध्या गावासाठी असाधारण आहे. असे असूनही, इतर अनेक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका या गावात त्यांच्या शाखा उघडण्याचा विचार करत आहेत.

रिपोर्टनुसार, पटेल समाजाचे बहुतांश लोक माधापरमध्ये राहतात. या गावाच्या समृद्धीचे कारण म्हणजे, येथील अनिवासी भारतीय कुटुंबे. ही कुटुंबे दरवर्षी स्थानिक बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये कोट्यावधी रुपये जमा करतात. गावात सुमारे 20,000 कुटुंबे आहेत, परंतु सुमारे 1,200 कुटुंबे परदेशात राहतात, त्यापैकी बहुतेक आफ्रिकन देशांतील आहेत. बरेच लोक यूके, ऑस्ट्रेलिया, यूएसए आणि न्यूझीलंडमध्ये देखील राहतात. (हेही वाचा; Gujarat Rich Thief: गुजरातच्या श्रीमंत चोराला अटक, लाईफस्टाईल पाहून पोलिसांनाही बसला धक्का)

अहवालानुसार, गुजरातमधील या लोकांचे मध्य आफ्रिकेतील बांधकाम व्यवसायांवर वर्चस्व आहे. जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्षा पारुलबेन कारा यांच्या म्हणण्यानुसार, या माधापर गावातील अनेक लोक परदेशात राहतात आणि नोकरी करतात, तरीही ते आपल्या गावाशी जोडलेले राहतात आणि ते जिथे राहतात त्याऐवजी इथल्या बँकांमध्ये पैसे जमा करणे पसंत करतात.