Arun Jaitley Funeral Live Update: अरुण जेटली पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात दिला निरोप
बातम्या
Siddhi Shinde
|
Aug 25, 2019 03:18 PM IST
नवी दिल्ली, 25th ऑगस्ट : भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांचे प्रदीर्घ आजारानंतर काल म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी एम्स (AIIMS) रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ज्यानंतर, राजकीय वर्तुळापासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वत्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, अरुण जेटली यांचे पार्थिव दिल्ली येथील त्यांच्या निवास्थानातून आज सकाळी 10 वाजता भाजपा कार्यालयात आणण्यात येणार आहे. तर संध्याकाळी 2.30 वाजता निगम बोध घाट (Nigambodh Ghat) परिसरात शासकीय इतमामात जेटलींवर अंत्यसंस्कार होतील.
कालपासूनच जेटली यांच्या घरी नेते मंडळींची वर्दळ आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ,काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी यांनी सुद्धा जेटली यांच्या राहत्या घरी त्यांच्या परिवाराची भेट घेतली.अमित शहा, सुरेश प्रभू सह भाजप, कॉंग्रेस नेत्यांकडून अरूण जेटली यांना श्रद्धांजली.
(Arun Jaitley यांनी केंद्रीय अर्थमंत्री पदी घेतले होते हे '6' मुख्य निर्णय)
अरुण जेटली यांची प्रकृती कित्येक महिन्यापासून खालावली होती. कॅन्सर, किडनी प्रत्यारोपण, श्वसनाचा त्रास, व अन्य अनेक व्याधींमुळे आलेला अशक्तपणा यामुळे 9 ऑगस्टला त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतरही कित्येकदा त्यांचे प्रकृती स्थिरावत होती मात्र काल दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर भाजपा सह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर असताना जेटली यांच्या कुटुंबीयांनी त्यांना दौरा रद्द न करण्याचे आवाहन केले आहे तर त्यांच्या वतीने गृह मंत्री अमित शहा आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी काल जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. अरुण जेटली यांचे व्यक्तिगत जीवन, शिक्षण आणि राजकीय कारकीर्द
दरम्यान, आज मोदी हे बहारीन मधील श्रीनाथजी मंदिराला भेट देणार आहेत, तत्पूर्वी त्यांनी काल बहरीन मधील भारतीयांशी संवाद साधताना" मी इतक्या दूर असताना माझा एक साथी हरपला "असे म्हणत जेटली यांच्या निधनाचा शोक व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे सुद्धा निधन झाले होते त्यापाठोपाठ जेटली यांचे जाणे म्हणजे भाजपा साठी मोठा भावनिक धक्का असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे.