जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथील अनंतनाग जिल्ह्यात एका जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. रमजान ईदनिमित्त सुट्टीवर आलेल्या मंजूर अहमद बेग यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (6 जून) सायंकाळी अनंतगाग जिल्ह्यातील सदुरा गावातील जवान मंजूर अहमद बेग यांच्या घरी काही अज्ञात इसमांनी प्रवेश केला. त्यानंतर घरामध्येच यांनी बेग यांची गोळ्या झाडून हत्या केली. बेग यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते.
हल्ल्यानंतर बेग यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. राष्ट्रीय रायफल्सच्या 34 व्या बटालियनमध्ये कार्यरत असलेले बेग सुट्टीवर येण्यापूर्वी शोपियान येथे तैनात होते. ईदनिमित्त ते 12 दिवसांच्या सुट्टीसाठी घरी आले होते. बेग यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. (जम्मू-काश्मीर: पुलवामा येथे सुरु असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा)
बेग यांच्या हत्येनंतर अनंतनागमध्ये हल्लेखोरांना शोधण्यासाठी जवानांनी शोध मोहिम सुरु केली आहे.