Arif Mohammad Khan, Bhagat Singh Koshyari, Tamilisai Soundararajan (Photo Credits: Instagram/Twitter)

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री राहिलेले आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan)  यांची केरळ राज्याचे राज्यपाल (Kerala Governor) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केरळ (Kerala) राज्याच्या राज्यपाल पदासोबतच केंद्र सरकारने इतर राज्यातील राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यात हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि तेलंगना राज्याचा समावेश आहे. राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आरिफ मोहम्मद खान यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या पहिल्याच प्रतिक्रियेत ते म्हणाले की, मला सेवा करण्याची संधी मिळाली.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, आरिफ मोहम्मद खान यांनी केरळ राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मी भारत या देशात जन्मलो यासाठी मी भाग्यवान आहे. हा देश विविधतेने नटलेला आणि अतिशय समृद्ध आहे. भारताचे विविध पैलू समजून घेण्यासाठी ही एक मोठी संधी असणार आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेश राज्याच्या राज्यपाल कलराज मिश्रा आता राजस्थान राज्याचे राज्यपाल असतील. तर, मिश्रा यांच्या ठिकाणी बंडारु दत्तात्रेय हे हिमाचल राज्याचे राज्यपाल असतील. राष्ट्रपती भवन कार्यालयात या नव्या राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणार रविवारी करण्यात आली. त्यानुसार कलराज मिश्रा हे राजस्थान त, भगत सिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल असतील. (हेही वाचा, भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, सी विद्यासागर राव यांचा पदाचा कार्यकाळ संपला)

एएनआय ट्विट

आरीफ मोहम्मद खान हे 80 च्या दशकात एक बडे काँग्रेस नेता होते. 1984 मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात ते केंद्रीय मंत्री होते. 1984 च्या शाहबानो प्रकरणात राजीव गांधी सरकारने संसदेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. या निर्णयामुळे व्यथित झालेल्या आरीफ मोहम्मद खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रदीर्घ काळ ते राजकारणापासून दूर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जून रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणावरील चर्चेला उत्तर देताना आरीफ मोहम्मद खान यांचा संदर्भ दिला होता. तेव्हापासून आरीफ मोहम्मद खान चर्चेत होते.