भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, सी विद्यासागर राव यांचा पदाचा कार्यकाळ संपला
Bhagat Singh Koshyari | (Photo Credits-Facebook)

उत्तारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल ( Governor of Maharashtra) म्हणून नियुक्त झाले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही घोषणा शनिवारी केली. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव (C Vidyasagar Rao) यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता भगत सिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कारभार पाहणार आहेत. 30 ऑगस्ट 2014 पासून 31 ऑगस्ट 2019 पर्यंत असे एकूण पाच वर्षे सी. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पद सांभाळले.

सन 17 जून 1942 मध्ये जन्मलेले भगत सिंह कोश्यारी हे प्रदीर्घ काळ भाजपचे निष्ठावान आणि बडे नेते राहिले आहेत. केश्यारी हे मुळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. 1977 मध्ये देशात लागू करण्यात आलेल्या आणिबाणीत केश्यारी यांना अटक झाल्याचेही सांगितले जाते. उत्तराखंड राज्याची निर्मिती झाले तेव्हा  कोश्यारी हे या नव्या राज्याचे भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले. 2001 ते 2002 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. 2002 ते 2007 पर्यंत त्यांनी उत्तराखंड विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केले. 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.

भगत सिंह कोश्यारी हे इंग्रजी विषयाचे जाणकार आहेत. त्यांनी इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केली असून, ते शिक्षक आणि पत्रकारही राहिले आहेत. 1975 मध्ये पिथौरागड येथून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पीयूष' या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक राहिले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदासोबतच केंद्र सरकारने इतर राज्यातील राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यात हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ आणि तेलंगना राज्याचा समावेश आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, आरिफ मोहम्मद खान यांनी केरळ राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत. तर, हिमाचल प्रदेश राज्याच्या राज्यपाल कलराज मिश्रा आता राजस्थान राज्याचे राज्यपाल असतील. तर, मिश्रा यांच्या ठिकाणी बंडारु दत्तात्रेय हे हिमाचल राज्याचे राज्यपाल असतील.