अलीकडेच द इकॉनॉमिक्स टाईम्स या वृत्तपत्रात आलेल्या एका बातमीत, आयसीएमआर, (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद- ICMR) आणि सीडीएससीओ (केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना) यांनी एका माहिती अधिकार अर्जात, ‘कोविड-19 लसींचे अनेक दुष्परिणाम होत असल्याचे’ स्वीकारले असल्याचे वृत्त दिले होते. आयसीएमआर आणि सीडीएससीओच्या अधिकाऱ्यांनी सर्व कोविड लसींमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा उल्लेख केला आहे, असेही या वृत्तात म्हटले आहे.
मात्र, असे स्पष्ट केले जात आहे की हे वृत्त, चुकीच्या माहितीवर आधारित असून, त्यात वस्तुस्थितीचा विपर्यास करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या धोरणाला अनुसरून, सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या जागतिक वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित सर्व तथ्ये, सादर करत, आयसीएमआरने लसींचे फायदे आणि तोटेविषयक आरटीआय क्रमांक R/X/22/00075 मधील प्रश्न क्रमांक 4 आणि 5 ना उत्तरे दिली आहेत.
या उत्तरात, जागतिक आरोग्य संघटना (WHO), आजार नियंत्रण केंद्र आणि केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संकेतस्थळांच्या लिंक्स देण्यात आल्या होत्या. ज्यात, कोविड-19 लसीबाबत जागतिक दर्जाचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. इतर सर्व आजारांवरील लसींप्रमाणेच, ज्यांना वेगवेगळ्या कोविड-19 लसींचे लसीकरण केले जाते त्यांना इंजेक्शनच्या ठिकाणी हलक्या संवेदना- वेदना,डोकेदुखी, थकवा, सांधेदुखी, अस्वस्थता, ताप, थंडी वाजणे, संधिवात अशासारखी सौम्य लक्षणे दिसू शकतात. क्वचितच, काही लोकांमध्ये- ज्यांच्या प्रकृतीला आधीपासून काही त्रास असतील, त्यांना गंभीर लक्षणेही आढळू शकतात.
जागतिक पातळीवरील अध्ययनात असे निदर्शनास आले आहे, की कोविड-19 लसीमुळे या आजाराचे गंभीर परिणाम होण्यापासून संरक्षण मिळते. त्यामुळे कोविड संसर्ग झाला तरी, रुग्णालयात दाखल होणे अथवा मृत्यू टाळता येतो. लसीचे हे फायदे, त्यामुळे होणाऱ्या किरकोळ दुष्परिणामांच्या तुलनेत कितीतरी अधिक महत्वाचे आहेत. भारतात, एनटीएजीआय (लसीकरणविषयक राष्ट्रीय तंत्रज्ञान सल्लागार गट) ने वेळोवेळी कोविड-19 च्या लसीमुळे होणारे लाभ आणि दुष्परिणाम यांचा आढावा घेतला असून, त्यांनीही वर उल्लेख केलेल्या तथ्यांना दुजोराच दिला आहे. (हेही वाचा: COVID-19 रोखण्यासाठी Novel Spray करणार मदत; फुफ्फुसांत संसर्ग होण्याचा धोका टळणार)
याव्यतिरिक्त, सीडीएससीओने आरटीआयच्या उत्तरात असेही सांगितले आहे की राष्ट्रीय औषध महानियंत्रकाने मान्यता दिलेल्या कोविड लसींची यादी सीडीएससीओच्या(cdsco.gov.in) संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सीडीएससीओनेही या विषयावर त्यांच्याकडे कोणतीही अतिरिक्त माहिती नसल्याचेही स्पष्ट केले आहे. या आरटीआयला उत्तर देतांना, ज्या लिंक्स जोडण्यात आल्या आहेत, त्यावर आयसीएमआरने कोणतेही मत व्यक्त केलेले नाही, अथवा टिप्पणी दिलेली नाही, हेही लक्षात घ्यायला हवे.