उद्योगपती अनिल अंबानी यांना धक्का, अब्जाधीश टॅग गमावला; जगप्रसिद्ध ‘बिलिनेयर क्लब’ मधून बाहेर
Anil Ambani | (Photo Credits: File Image)

आर्थिक अडचणीत सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. अनिल अंबानी यांच्या कंपन्या आणि उद्योग समूह प्रदीर्घ काळापासून आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. असे असतानाच अनिल अंबानी हे जगातील अब्जाधीश व्यक्तींच्या यादीतून अर्थातच ‘बिलिनेयर क्लब’ (Billinair Club) मधून बाहेर पडले आहेत. मंगळवारी (18 जून 2019) शेअर बाजार बंद झाला तेव्हा अनिल अंबानी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रिलायन्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Total market capitalization) सुमारे 5400 कोटी रुपये इतके राहिले होते.

दरम्यान, मंगळवारपूर्वी सोमवारी (17 जून 2019) बाजार बंद झाला तेव्हा अनिल धीरुभाई अंबानी समूहाच्या 6 कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सुमारे 6196 कोटी रुपये इतके होते. चार महिन्यांपूर्वीचा हाच आकडा 8 हजार कोटी रुपये इतका होता. अनिल अंबानी यांचे आपल्या 6 कंपन्या म्हणजेच रिलायन्स नेवल अॅण्ड इंजीनियरिंग, रिलायन्स पॉवर, रिलायन्स कॅपीटल, रिलायन्स होम फाइनान्स, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर तसेच, अलिकडेच बंद झालेली रिलायन्स कम्युनिकेशन या कंपन्यांवर 75 टक्क्यांपेक्षा कमी भागिदारीत नियंत्रण ठेवतात. बाजार भांडवली मूल्यानुसार आता त्यांच्याकडे 1 बिलियन डॉलर पेक्षाही कमी संपत्ती राहिली आहे. (हेही वाचा, कर्जबाजारी झालेल्या अनिल अंबानी यांनी विकायला काढले BIG FM; तब्बल 1200 कोटींना ठरला व्यवहार)

दरम्यान, आर्थिक अडचणी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी संघर्ष करत असलेल्या अंबानी यांनी आपल्या बऱ्याच कंपन्यांची भागिदारी विकली आहे. अनिल अंबानी यांनी गेल्या मंगळवारी म्हटले होते की, त्यांच्या कंपनीने गेल्या 14 महिन्यांमध्ये 35 हजार रुपये इतक्या कर्जाची परतफेड केली आहे. तसेच, अनिल अंबानी यांनी असेही म्हटले आहे की, येणाऱ्या नजिकच्या काळात आपण आपली सर्व देणी चुकती करु.

दरम्यान, अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे शेअर सातत्याने कोसळत आहेत. दरम्यान, गुंतवणूकदारांनाही नजिकच्या काळात काही विशेष सकारात्मक घडेल असा विश्वास वाटत नाही. अनिल अंबानी यांच्या संपत्ती झालेली घट ही गेल्या काही काळांपासून कर्जाच्या बोजाखाली दबलेला त्यांचा उद्योगसमूह हेच असल्याची चर्चा आहे.