आंध्र प्रदेश: एका रात्रीत शेतकरी झाला लखपती, कष्टाने नव्हे नशिबाने; शेतात सापडला मौल्यवान हिरा
Diamond | Image only representative purpose (Photo credit: pxhere)

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh राज्यातील कुरनूल (Kurnool) जिल्ह्यात एक शेतकरी आपल्या कष्टाने नव्हे तर, चक्क नशिबाने लखपती (Lakhpati) झाला आहे. या शेतकऱ्याला त्याच्या शेतात एक मौल्यवान हिरा (Diamond) सापडला. परिस्थितीने अत्यंत गरीब असलेल्या या शेतकऱ्याने हा हिरा एका व्यापाऱ्याला विकला. त्या बदल्यात हिऱ्याची किंमत म्हणून या व्यापाऱ्याने त्या शेतकऱ्याला 13.5 लाख रुपये रोख आणि वर पाच तोळे सोने दिले. दरम्यान, ही माहिती परिसारत वाऱ्यासारखी पसरली आणि पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या शेतकऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, कुरनूल जिल्ह्यातील गोलावनेपल्ली या गावातील हा शेतकरी आपल्या शेतात काम करत होता. दरम्यान, त्याला एक वेगळ्या प्रकारची वस्तू सापडली. त्याने ती वस्तू जरा काळजीपूर्वक निरखली आणि ती घासून पुसून स्वच्छ केली. पाहतो तर काय, ही वस्तू चक्क हिरा होती. दरम्यान, या हिऱ्याचा रंग, वजन आणि आकार याबाबत माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी म्हटले आहे की, प्रकरणाचा तपास सुरु आहे. लवकरच सर्व माहिती उपलब्ध होईल.

यंदाच्या पावसाळ्यात कुरनूल जिल्ह्यात हिरा सापडण्याची घडलेली ही दुसरी घटना आहे. या आधीही गेल्या महिन्यात (12 जून) एका धनगराला मेंढ्या राखताना 8 कॅरेटचा एक हिरा सापडला होता. त्याने तो हिरा 20 लाख रुपयांना विकला होता. प्रत्यक्षात या हिऱ्याची किंमत 50 लाख इतकी होती. (हेही वाचा, कोहिनूर हिरा गिफ्ट नव्हे तर नुकसान भरपाईच्या स्वरूपात ब्रिटिशांकडे - भारतीय पुरातत्व विभागाचा खुलासा)

कुरनूल जिल्ह्यात अनेक गावांना चक्क पावसाळा सुरु होण्याची प्रतिक्षा असते. पावसाळा सुरु झाला की परिसरातील अनेक लोक इथे हिरे शोधण्यासाठी येतात. इथला परिसर हा हिरे उत्पादनासाठीही ओळखला जातो. पावसाळ्यात जमीनीचा वरचा भाग पाण्याने वाहून गेला की, जमीनीखाली असलेले हिरे पृष्ठभागावर येतात. याच हिऱ्यांचा लोक शोध घेत असतात.