Clash broke out between YSRCP and TDP workers | (Photo Credits: ANI/Twitter)

Andhra Pradesh Assembly Elections 2019: आंध्र प्रदेश राज्यात मतदानादरम्यान तेलुगू देसम पार्टी (Telugu Desam Party ), वायएसआर काँग्रेस (YSR Congress Party) या दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या वेळी दोघा जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी दोघेही राजकीय नेते आहेत. त्यापैकी एक सिद्दा भास्कर रेड्डी (Sidda Bhaskar Reddy) हे टीडीपी (TDP ) तर दुसरे पुल्ला रेड्डी (Pulla Reddy) हे वायएसआर काँग्रेस (YSRCP)नेते आहेत. अनंतपूर जिल्ह्यातील मीरापुरम येथे मतदान सुरु असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भीडले.

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) राज्यात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2019) आणि विधानसभा निवडणूक (Assembly Elections) एकत्रच पार पडत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासोबत आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान पार पडत आहे. आज (11 एप्रिल) सकाळी सात वाजलेपासून मतदानास सुरुवात झाली.

प्राप्त माहितीनुसार, सिद्दा भास्कर रेड्डी टीडीपीचे डमी एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप होता. या आरोप-प्रत्यारोपावरुनच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. सुरुवातीला झालेल्या किरकोळ शाब्दिक वादाचे पर्यावसन पुढे गंभीर हाणामारीत झाले. दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. घटनेची माहिती कळताच पोलीस कुमक घेऊन घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवत परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही कार्यकर्त्यांनी दगडफेकही केली आणि वातावरण पुन्हा गंभीर बनले. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: EVM मध्ये बिघाड असल्याच्या संताप, आंध्र प्रदेशातील आमदाराने मशीन जमिनीवर फेकली (Video))

एएनआय ट्विट

झालेल्या हाणामारीत टीडीपी नेता सिद्दा भास्कर रेड्डी आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे पुल्ला रेड्डी यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. जखमी सिद्दा रेड्डी आणि पुल्ला रेड्डी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.