Amritpal Singh (Photo Credits: X/@Gagan4344)

Amritpal Singh To Launch Political Party: पंजाबमधील खादूर साहिब मतदारसंघातील खासदार अमृतपाल सिंगने (Amritpal Singh) नवा राजकीय पक्ष (Political Party) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. सध्या खासदार राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) आसाममधील दिब्रुगड तुरुंगात बंद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 जानेवारी रोजी श्री मुक्तसर साहिब येथे होणाऱ्या मेळ्यादरम्यान पंजाबमध्ये अमृतपाल सिंहचा नवा प्रादेशिक पक्ष उदयास येणार आहे. या पक्षाच्या नावाची घोषणा अमृतपालचे वडील आणि त्यांच्या निकटवर्तीयांकडून केली जाण्याची शक्यता आहे. घोषणा झाल्यापासून पंजाबच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीत विजय-

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीदरम्यान अमृतपालने पंजाबमधील खदूर साहिब मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी अमृतपालला खदूर साहिबमधून 404.430 मते मिळाली होती. अमृतपालने काँग्रेसचे उमेदवार कुलबीर सिंग झिरा यांच्याकडून 197.120 मतांनी विजय मिळवला होता. पंजाबमधील लोकसभा जागांवर कोणत्याही उमेदवाराने नोंदवलेला हा सर्वात मोठा विजय होता.

पंजाबमध्ये अकाली दल कमकुवत झाल्यानंतर तेथे सांप्रदायिक राजकारणाला थोडी जागा मिळाली आहे. याचा फायदा अमृतपाल सिंग आणि त्याच्या समर्थकांना घ्यायचा आहे. अमृतपाल सिंगने उघडपणे पंजाब वेगळे करून खलिस्तान निर्माण करण्याची वकिली केली आहे, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. आधी त्याचा निवडणुकीतील विजय आणि आता राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या बाबीकडे पंजाबमध्ये कट्टरतावादी राजकारणाचा उदय म्हणून पाहिले जात आहे. (हेही वाचा: CM Pinarayi Vijayan On Nitesh Rane: नितेश राणे यांच्या ‘मिनी पाकिस्तान’ वक्तव्यावरुन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचेकडून निषेध)

कोण आहे अमृतपाल सिंग?

अमृतपाल सिंग हा खलिस्तानचा समर्थक आणि 'वारीस पंजाब दे'चा प्रमुख आहे. अमृतपालचा जन्म 17 जानेवारी 1993 रोजी अमृतसरच्या जल्लूपूर खेडा येथे झाला. 2021 मध्ये अमृतपाल कुटुंबाच्या वाहतूक व्यवसायात सामील झाला आणि दुबईला गेला. यानंतर 2022 मध्ये अमृतपाल भारतात परतला आणि 2023 मध्ये अमृतसरच्या अजनाळा पोलीस ठाण्यात झालेल्या हिंसाचारानंतर अमृतपाल चर्चेत आला. आपला सहकारी लवप्रीत सिंग तुफान याच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या अमृतपालने त्याच्या समर्थकांसह 23 फेब्रुवारी रोजी अजनाळा पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याचा आरोप आहे. अमृतपाल सिंगच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर त्याला एनएसए अंतर्गत अटक करण्यात आली. मृतपाल 23 एप्रिल 2023 पासून दिब्रागड तुरुंगात बंद आहे.