पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये अम्फान चक्रीवादळामुळे (Cyclone Amphan) आतापर्यंत 86 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banarjee) यांनी दिली आहे. मागील तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या या संकटकाळात पश्चिम बंगाल मध्ये अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे, सामान्य सुविधा सुद्धा कोलमडून पडल्या आहेत. दुसरीकडे कोरोनासारखे भीषण संकट सुद्धा जोरावर आहे. अशावेळी सरकारी भूमिकेवरून संतप्त पश्चिम बंगालच्या रहिवाशांनी शहरातील विविध भागात निषेध व नाकेबंदी केल्याचे समजत आहे. Cyclone Amphan: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अम्फान चक्रीवादळ बाधित भागांचे केले हवाई सर्वेक्षण, Watch Video
प्राप्त माहितीनुसार, 86 मृत्यूंपैकी 22 जण हे विजेच्या धक्क्याने तर 2जण विजेचा खांब कोसळल्याने मृत्यूमुखी पडले आहेत. 27 जणांवर झाडे कोसळून 21 जणांवर भिंत कोसळून, 7 जणांवर घर कोसळल्याने, 3 जण बुडून तर एकाला साप चावल्याने मृत्यू झाला आहे. याशिवाय 3 जणांचा कार्डियाक अरेस्ट मुळे सुद्धा मृत्यू झाला आहे. या चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागातील लोक बेघर झाले आहेत. इंटरनेट कनेक्शन आणि इतर दळणवळणाची साधने सर्व काही कोलमडून पडले आहे असे समजतेय.
ANI ट्विट
Death toll rises to 86 due to #AmphanCyclone: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/BfHMQ7g8iV
— ANI (@ANI) May 23, 2020
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे राज्यातील सुमारे दीड कोटी नागरिक हे प्रत्यक्ष प्रभावित झाले असून 10 लाखाहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.कोलकाता, आणि उत्तर व दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात काही ठिकाणी वीज व मोबाईल कनेक्शन पूर्ववत होत आहेत पण अनेक ठिकाणी अजूनही परिस्थिती भीषण आहे.यासाठी काम केले जात आहे तरी नागरिकांनी धीर धरावा असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
दरम्यान,राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या पथकांनी युद्धपातळीवर काम सुरु केले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ममता बॅनर्जी यांच्यासह चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांचे हवाई सर्वेक्षण केले. संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक करीत मोदींनी राज्यासाठी एक हजार कोटी रुपयांची आगाऊ मदत जाहीर केली.