Amit Shah Arunachal Pradesh Visit: 'अरुणाचल प्रदेश हा नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहील'; चिनी प्रवक्त्याच्या टीकेला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर
Arindam Bagchi (संग्रहित संपादित प्रतिमा)

गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्या अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) दौऱ्यावर चीनने (China) घेतलेला आक्षेप भारताने फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam Bagchi) यांनी मंगळवारी सांगितले की, अरुणाचल प्रदेश हे राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या अशा भेटीवर आक्षेप घेण्याचे कारण नाही आणि आक्षेप घेतलाच तरी वास्तव बदलणार नाही. बागची पुढे म्हणाले, 'आम्ही चिनी अधिकार्‍यांचे म्हणणे नाकारतो. भारतातील इतर कोणत्याही राज्याप्रमाणेच भारतीय नेते नियमितपणे अरुणाचल प्रदेशला भेट देतात.’

शाह यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना बागची यांनी ही माहिती दिली. सोमवारी अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती गावात 'व्हायब्रंट व्हिलेज' कार्यक्रमाचा शुभारंभ करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चीनला स्पष्ट संदेश देत म्हटले होते की, भारताच्या सीमेवर कोणीही अतिक्रमण करण्याचा काळ केव्हाच गेला आहे. आता कोणीही देशाच्या प्रादेशिक अखंडतेवर वाईट नजर टाकण्याचे धाडस करू शकत नाही.

ते पुढे म्हणाले होते की, लष्कर आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) च्या शौर्याने हे सुनिश्चित केले आहे की, सुईच्या टोकाइतक्याही भारताच्या भूमीवर कोणी अतिक्रमण करू शकत नाही. त्यानंतर सोमवारी चीनने गृहमंत्री अमित शहा यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर टीका करत म्हटले की, त्या भागावरील चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाले आहे. गेल्या आठवड्यात, भारताने चीनने केलेल्या काही ठिकाणांच्या नामांतराला स्पष्टपणे नकार दिला आणि पुनरुच्चार केला की, हे राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे. (हेही वाचा: Amit Shah 2024 Prediction: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 300 हून अधिक जागा जिंकून मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील; अमित शहा यांची भविष्यवाणी)

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की, चीनकडून असा प्रयत्न होण्याची ही पहिलीच वेळ नाही आणि आम्ही तो पूर्वीप्रमाणेच फेटाळतो. चीनी मंत्रालयाने जारी केलेली अरुणाचल प्रदेशसाठी प्रमाणित भौगोलिक नावांची ही तिसरी यादी आहे. अरुणाचलमधील सहा ठिकाणांच्या प्रमाणित नावांची पहिली यादी 2017 मध्ये आणि 15 ठिकाणांची दुसरी यादी 2021 मध्ये प्रसिद्ध केली होती.