Amarnath Yatra 2019: अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट, सुरक्षा दलाला स्पेसिफिक अलर्ट
Amarnath Yatra 2018 | File Photo, Photo Credits: PTI)

Amarnath Yatra 2019:  येत्या 1 जुलै 2019 पासून अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) सुरु होत आहे. यात्रेदरम्यान आवश्यक त्या सर्वप्रकारच्या सुरक्षेची काळजी केंद्र सरकारने घेतली आहे. मात्र, तरीही अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याचे प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भक्तांच्या सुरक्षेबाबत सुरक्षा यंत्रणेला स्पेसिफिक अलर्ट (Specific Alert) देण्यात आल्याचेही प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, आज तक या वृत्तवाहिणीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी बालटाल येथील रस्त्यावरुन जाणाऱ्या अमरनाथ यात्रेला दहशतवादी निशाणा बनवू शकतात. दरम्यान, या वृत्तात असेही म्हटले आहे की, जैशचे दहशतवादी बालटाल येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला आपल्या हल्याचे लक्ष बनवू शकतात. मल्टी एजन्सी सेंटरने स्पेसिफिक अलर्ट जारी करत म्हटले आहे की हे जैशचे दहशतवादी आहेत. जे नागबल-कंगन आणि गन्दरबल येथील पर्वतीय परिसरात आले आहेत.

गन्दरबल आणि मगाम तसेच कंगन हा परिसर पर्वत आणि डोंगररांगांनी व्यापलेला अतिशय दुर्गम आहे. येथून लाईन ऑफ कंट्रोल जवळ जम्मू काश्मीरचा गुरेज सेक्टर आहे. पाकिस्तान येथून नेहमीच घुसखोरी करतो. मात्र, अलिकडील काही काळात सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानला वेळीच हिसका दाखवल्यामुळे या ठिकाणाहून होणाऱ्या घुसखोरीचे प्रमाण बरेच कमी आले आहे. (हेही वाचा, जुलै महिन्यात भारतात साजरे होतात हे उत्सव; पावसाळ्यात फिरण्यासोबत जाणून घ्या देशाची संस्कृती)

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमं म्हणताहेत की, दहशतवादी काश्मिरमध्ये आणि अमरनाथ यात्रा तसेच सुरक्षा दलावर हल्ला करण्याचा करट आखत आहेत. यात काही पाकिस्तानी दहशतवाद्यांचाही सामावेश आहे. त्यामुळे सुरक्षा दलाने यात्रेदरम्यान, दोन्ही मार्गावर (पहलगाम-बालटाल) अलर्ट जारी केला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा कडक करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-कश्मीर दौरा नुकताच केला. तसेच, अधिकाऱ्यांना अमरनाथ यात्रेबाबत कडक सुरक्षा तैनात करण्याचे आदेशही दिले.