Airbag Case: एअरबॅग्स उघडल्या नाहीत तर, कार कंपनी ठरणार दोषी? सीट बेल्टकडे दुर्लक्ष करणे चालकाला पडले महागात, NCDRC ने दिला महत्त्वाचा निर्णय
Airbag

Airbag Case: राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC) अलीकडेच एक महत्वाचा निर्णय दिला आहे, ज्यामध्ये राज्य आयोगाने एका अपघातानंतर एअरबॅग्ज (Airbag) न उघडल्याने होंडाला (Honda) 1 लाख रुपयांची भरपाई म्हणून देण्याचे निर्देश देणारा आदेश बाजूला ठेवला आहे. या प्रकरणात कारमधील प्रवाशांनी सीट बेल्ट बांधलेले नसल्यामुळे एअरबॅग्स उघडल्या गेल्या नाहीत, हे लक्षात आल्यावर एनसीडीआरसीने हा निर्णय घेतला. कारमधील एअरबॅग फक्त सीट बेल्ट बांधल्यावरच काम करतात.

अहवालानुसार, एका व्यक्तीच्या होंडा सिविक कारला अपघात झाला, त्यामुळे कारचा पुढील भाग खराब झाला आणि चालकाला दुखापत झाली. त्यानंतर कार मालकाने राज्य ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली आणि दावा केला की गाडीमधील एअरबॅग न उघडल्याने त्याला दुखापत झाली आहे आणि होंडाने त्याची भरपाई करावी. त्यानंतर राज्य आयोगाने होंडाला 1 लाख भरपाई देण्याचे आदेश दिले.

याबाबत होंडाने एनसीडीआरसीकडे अपील केले आणि असा युक्तिवाद केला की, जेव्हा सीट बेल्ट घातल्या जातात फक्त तेव्हाच एअरबॅग्ज उघडतात. या प्रकरणामध्ये तक्रारदाराने सीट बेल्ट लावल्या नव्हत्या व त्यामुळे एअरबॅग्ज उघडल्या नाहीत. कारमध्ये कोणताही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट नसल्याचेही त्यांनी सांगितले. एनसीडीआरसीने होंडाचे अपील मान्य केले आणि राज्य आयोगाचा आदेश रद्द केला. (हेही वाचा: Ola Reduces Prices of S1X Variants: ओलाने कमी केल्या आपल्या एस1 एक्स व्हेरिएंटच्या किंमती; सर्वात स्वस्त स्कूटर आता 69,999 रुपयांना मिळणार, जाणून घ्या सविस्तर)

तक्रारदार मॅन्युफॅक्चरिंग दोष सिद्ध करण्यात अयशस्वी झाला. राज्य आयोगाने कोणत्याही तांत्रिक किंवा तज्ञांच्या मताशिवाय आणि तथ्ये किंवा कायदेशीर पूर्वस्थितीचा कोणताही आधार न घेता आपला निर्णय दिला होता, जो एनसीडीआरसीने रद्द ठरवला.

लक्षात ठेवा-

  • नेहमी सीट बेल्ट लावा; तुमच्या सुरक्षिततेसाठी हे खूप महत्वाचे आहे.
  • कार मॅन्युअल काळजीपूर्वक वाचा. एअरबॅग्ज आणि इतर सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल माहिती मिळवा.
  • कोणत्याही समस्येच्या बाबतीत डीलर किंवा उत्पादकाशी संपर्क साधा.