देशातील अडकलेल्या लोकांसाठी Air India 19 मे ते 2 जून या कालावधीमध्ये चालवणार Domestic Flights; जाणून घ्या कोणत्या शहरासाठी किती विमाने
File image of an Air India flight (Photo Credits: ANI)

पीएम नरेंद्र मोदी यांनी काल सांगितल्याप्रमाणे भारत आता कोरोना व्हायरस लॉक डाऊनच्या (Coronavirus Lockdown)  4 थ्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. अशात देशातील वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी रेल्वे सेवा (Railway Services) सुरू करण्यात आली. त्यानंतर आता अशी बातमी आहे की एअर इंडिया (Air India) 19 मे ते 2 जून या कालावधीत रेल्वेसारखेच लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी विशेष घरगुती विमाने (Domestic Flights) सुरू करणार आहे. यातील बहुतेक उड्डाणे दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु येथून होणार आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार चेन्नईसाठी फक्त एका विमानाची सुविधा देण्यात आली आहे. 19 मे रोजी कोची ते चेन्नई येथे हे उड्डाण होईल. याशिवाय दिल्लीसाठी 173, मुंबईसाठी 40, हैदराबादसाठी 25 आणि कोचीसाठी 12 उड्डाणे सुरू करण्यात येणार आहेत. दिल्लीहून उड्डाण करणारी विमाने अमृतसर, बेंगळुरू, गया, हैदराबाद, जयपूर, अहमदाबाद, कोची, विजयवाडा, लखनऊ आणि इतर काही शहरांमध्ये जातील. त्याचप्रमाणे मुंबई येथून उड्डाण करणारी विमाने अहमदाबाद, हैदराबाद, कोची, बेंगळुरू, विशाखापट्टणम आणि विजयवाडा येथे होणार आहेत. याशिवाय हैदराबादहून मुंबई आणि दिल्ली येथेही उड्डाणे करण्यात येणार आहेत. बंगळुरुहून मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद येथे उड्डाणे असतील. यासह भुवनेश्वरहून बंगळुरूला विमान जाणार आहे.

(हेही वाचा: 16 ते 22 मे दरम्यान चालणार वंदे भारत अभियानाचा दुसरा टप्पा; 31 देशांसाठी 149 विमानांद्वारे एअर इंडिया घेऊन येणार परदेशातील भारतीयांना)

एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्या बाजूने सर्व तयारी पूर्ण केली गेली आहे. आता ते नागरी उड्डाण मंत्रालयाकडून मंजुरीची प्रतीक्षा करीत आहोत. परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणल्यानंतर आता ते या दुसर्‍या टप्प्याकडे वाटचाल करत आहेत. दुसऱ्या टप्प्यात देशांतर्गत उड्डाणांना परवानगी देण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. कोरोना संकटाच्या काळात प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास करण्यास मदत करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.