आजचा दिवस केरळ (Kerala) साठी एक काळ बनून आला. इडुक्की येथे झालेल्या भूस्खलनात आज 15 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर आता संध्याकाळी केरळमधील कोझिकोड (Kozhikode) येथे एयर इंडियाच्या विमानाचा अपघात (Air India Flight Accident) झाला. एयर इंडियाच्या आयएक्स 1344 (IX1344) विमानाने संध्याकाळी दुबईहून उड्डाण घेतले. हे विमान करीपूर विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले व दरीत कोसळले. या अपघातामध्ये 16 मृत्यू, 123 जखमी आणि 15 गंभीर जखमी झाल्याची माहिती मल्लपुरम एसपी यांनी एएनआय दिली. या विमानात जवळजवळ 180 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत कोसळत असणाऱ्या पावसामुळे रनवे वर पाणी साठले होते, अशात दृश्यमानता कमी झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज सायंकाळी 4.45 वाजता हे विमान दुबईहून निघाले होते व सायंकाळी 7 वाजून 41 वाजता हे विमान धावपट्टीवरून घसरले. या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना कोझिकोड मेडिकल कॉलेज व इतर जवळच्या रुग्णालयात दाखल केले जात आहे. सध्या सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. फक्त एक प्रवासी विमानात आहे पण तो सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.
एएनआय ट्वीट-
#UPDATE Death toll in the Air India Express flight crash landing incident at Kozhikode rises to 16: Directorate General of Civil Aviation (DGCA) https://t.co/L6rHLnswJj
— ANI (@ANI) August 7, 2020
नागरी उड्डयन मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार केरळच्या कोझिकोड येथील करिपूर विमानतळावर आज संध्याकाळी ज्या विमानाचा अपघात झाला, त्यामध्ये 174 प्रवासी, 10 लहान बाळे, 2 पायलट आणि 4 केबिन क्रू होते. अपघानंतर ताबडतोब राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) पथक व मेडिकल पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे व त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते व ते आता पूर्ण झाले आहे. तसेच एआयएच्या मदत पथकांना दिल्ली, मुंबई येथून रवाना केले आहे. (हेही वाचा: कोझिकोड येथे Air India चे विमान धावपट्टीवर उतरताना घसरून दरीत कोसळले; वैमानिक दीपक वसंत साठे यांचा मृत्यू)
या अपघातानंतर नागरी उड्डयन मंत्रालयाची तातडीची बैठक राजीव गांधी भवन येथे सुरू आहे. डीजीसीएचे महासंचालक आणि मंत्रालयाचे अधिकारी, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि एअर इंडिया एक्सप्रेस या बैठकीत उपस्थित आहेत. विमान अपघात अन्वेषण ब्युरोमार्फत औपचारिक चौकशी केली जाईल असे विमान वाहतूक मंत्र्यांनी सांगितले आहे.