मोहन भागवत यांच्यावर टीका करत असदुद्दीन औवेसी यांनी म्हटले- भारत हा कधीच हिंदू राष्ट्र नव्हता, आहे आणि होणार ही नाही
Asaduddin Owaisi (Photo Credits-Twitter)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यावर ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहालदुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे खासदार असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी टीका करत असे म्हटले आहे की, भारत हा कधीच हिंदू राष्ट्र नव्हता, आहे आणि होणार सुद्धा नाही. तर भागवत हे भारताला हिंदू राष्ट्र म्हणत त्यामागील इतिहास कधीच मिटवू शकत नाहीत. त्याचसोबत संस्कृती, विश्वास, पंथ आणि व्यक्तिगत ओळख हे सर्व मुद्दे हिंदू संस्कृतीत सामील आहेत असे औवेसी यांनी म्हटले आहे.

औवेसी यांनी भागवत यांच्यावर टीका केल्यानंतर अजून एक ट्वीट करत असे म्हटले आहे की, भागवत हे विदेशातील मुस्लिम लोकांसोबत आम्हाला जोडण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळे आमची भारतीयता कुठे ही कमी होत नाही. त्याचसोबत पुढे औवेसी यांनी असे ही म्हटले, हिंदू राष्ट्र = हिंदू सर्वोच्चता. हे आमच्यासाठी अस्विकार्य आहे.(मुस्लिम महिला बांधणार नरेंद्र मोदी यांचे मंदिर; तिहेरी तलाक हटवण्यासाठी आभार मानत देणार खास भेट)

गेल्या काही दिवसांपूर्वी मोहन भागवत यांनी असे म्हटले होते की, भारत हा हिंदूंचा देश आहे. आम्ही हिंदू राष्ट्राचे आहोत. तसेच हिंदू कोणत्याही पूजेचे, भाषेचे किंवा कोणत्या प्रांत किंवा प्रदेशाचे नाव नाही आहे. हिंदू एक संस्कृतीचे नाव असून भारतात राहणाऱ्या प्रत्येकाचा जगण्याचा सांस्कृतिक वारसा आहे.