Madurai च्या जोडप्याचे Mid-air Wedding चे फोटो वायरल झाल्यानंतर कोविड 19 चे नियम धुडकल्यावरून DGCA ने दिले कारवाईचे आदेश
Marriage on Flight (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतामध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव पाहता सरकारकडून कडक नियमावलीची अंमलबजावणी केली जात असताना मदुराईच्या एका जोडप्याने विमानातच लगीनगाठ बांधली. ऑन बोर्ड बारातींसोबत हे जोडपं लग्नाच्या बंधनात मात्र अडकलं पण जोडप्यासह वर्‍हाड्यांनी कोविड-19 च्या नियमावलीचं उल्लंघन केल्याने आता DGCAने कारवाईचे आदेश दिले आहेत. काल (23 मे) मदुराई वरून स्पाईस जेटचे विमान आकाशात झेपावले आणि त्यामध्येच लग्नाचा सोहळा पार पडला.

आकाशात 2 तास असलेल्या विमानामध्ये या जोडप्याचे लग्नाचे विधी पार पडले. पण वर्‍हाड्यांसह विमानसेवा कंपनीने नियम मोडल्याचं सांगत आता त्यांना DGCA च्या कारवाईला सामोरं जाण्याची शक्यता आहे. DGCA ने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विमानसेवेच्या ऑनबोर्ड कर्मचार्‍यांना सध्या सेवेपासून दूर ठेवले आहे. तर स्पाईज जेटला संबंधित व्यक्तींवर, वर्‍हाडींवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

स्पाईस जेटची प्रतिक्रिया

 

दरम्यान स्पाईस जेट ने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या जारी परिपत्रकानुसार क्रु कडून या विवाहसोहळ्यात सहभागी होणार्‍यांना वेळोवेळी प्रोटोकॉलची माहिती देण्यात आली होती मात्र त्यांनी ती धुडकावली. जॉयराईड साठी विमान बुक केलेले असले तरीही अशाप्रकारे सोहळ्यांना परवानगी नसेल असे त्यांनी सांगितले असल्याचा दावा स्पाईसजेटचा आहे.

लग्नासाठी या जोडप्याने मदुराई ते बेंगलोर असे स्पाईस जेटचे विमान 23 मे साठी बुक केले होते. मीडीया रिपोर्ट्सनुसार, तमिळनाडूच्या मदुराई मंदिराला पार केल्यानंतर वर-वधू विवाहबंधनात अडकले. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव पाहता दक्षिण भारतातील कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये 31 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आहे.