मोबाईल टॉवरची चोरी (अंग्रहित संपादित प्रतिमा)

बिहारमध्ये (Bihar) लोखंडी पूल आणि रेल्वे इंजिनच्या चोरीच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. काही महिन्यांपूर्वी रोहतास येथे लोखंडी पूल चोरीला गेला होता. त्यानंतर या आठवड्यात बेगुसराय येथील बरौनी स्थानकावरून रेल्वेचे इंजिन चोरीला गेले. या बातम्या ऐकल्यानंतर बिहारमध्ये काहीही चोरी होऊ शकते, असे दिसून येते. आता अशीच एक घटना समोर आली आहे. पाटण्यात चोरट्यांनी चक्क मोबाईल टॉवर (Mobile Tower) गायब केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धूर्त चोरांनी टॉवर चोरण्यासाठी एक कथा रचली. चोरट्यांनी जमीन मालकाला कंपनी बंद झाल्याचे सांगितले. हा टॉवर लवकरात लवकर हटवावा, अशा सूचना कंपनीकडून देण्यात आल्या आहेत, असे मालकाला सांगितले. त्यानंतर तीन दिवसात चोरट्यांनी टॉवरचा प्रत्येक भाग चोरून नेला. हा मोबाईल टॉवर जीटीपीएल कंपनीचा होता.

हा टॉवर पाटणा येथील गार्डनीबाग येथे बसवला होता. या आठवड्यात चोरटे कंपनीचे अधिकारी म्हणून आले आणि त्यांनी जमीन मालकाशी बोलणे केले. जमीन मालकाने कोणतेही क्रॉस चेक केले नाही. स्थानिक लोकांनी सांगितले की, चोरटे सलग तीन दिवस टॉवरचा काही भाग पळवून नेत होते, मात्र आम्हाला वाटले की ते कंपनीचे कर्मचारी आहेत, त्यामुळे त्यांना कोणीही अडवले नाही. ही चोरीची घटना उघडकीस येताच स्थानिक लोक अवाक् झाले.

गार्डनीबाग येथील लालनसिंग यांच्या जमिनीवर हा टॉवर होता. या संदर्भात चोरट्यांनी ललनसिंग यांच्याशी बोलले असता तेही तयार झाले. त्यांना वाटले की जमीन रिकामी होईल, म्हणूनच त्यांनी काहीही विचार न करता चोरांना टॉवर काढण्याची परवानगी दिली. यानंतर 10 चोरट्यांनी टॉवरचा प्रत्येक भाग पिकअपवर भरून तीन दिवसात पळ काढला.

मोबाईल टॉवरची चोरी- 

दरम्यान, कंपनीचे कर्मचारी सुनील कुमार यांनी सांगितले की, जीटीएल कंपनीचा हा टॉवर काही वर्षांपासून बंद होता. नुकतेच कंपनीचे अधिकारी त्यांच्या टॉवरची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना तिथे टॉवरच नसल्याचे दिसून आले. याबाबत जमीन मालकाला विचारणा केली असता त्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी काही लोक आले होते आणि स्वतःला कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून टॉवर काढून घेऊन गेले. (हेही वाचा: 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला 5 उठाबशा काढण्याची शिक्षा; Bihar मधील धक्कादायक घटना)

त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्याने कंपनीकडून असे कोणतेही लोक आले नसल्याचे सांगितले. चोरांनी सुमारे 19 लाखांचा टॉवर चोरल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गार्डनीबाग पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवावा, अशी विनंती कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे पोलीस ठाणे प्रमुखांनी सांगितले.