AFSPA Extended for 6 Months in Manipur-Nagaland प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Edited Image)

AFSPA Extended for 6 Months in Manipur-Nagaland: गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर (Manipur) मध्ये अधूनमधून हिंसाचार होत आहे. ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये AFSPA लागू करण्यात आला आहे. अशांत भागात कार्यरत असलेल्या सशस्त्र दलांना व्यापक अधिकार आणि खटल्यापासून मुक्तता देणारा सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा रविवारी मणिपूरमधील 13 पोलिस स्टेशन वगळता संपूर्ण राज्यात आणखी सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला. गृह मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली.

मंत्रालयाने म्हटले आहे की, या कायद्यामुळे केंद्राच्या मान्यतेशिवाय अशांत भागात कार्यरत असलेल्या सशस्त्र दलांना व्यापक अधिकार आणि खटल्यापासून मुक्तता मिळते. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अशांत घोषित केलेल्या भागात लागू असलेल्या AFSPA कायद्याची वैधता नागालँडच्या आठ जिल्ह्यांमध्ये आणि इतर पाच जिल्ह्यांतील 21 पोलिस स्टेशन क्षेत्रात सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आली आहे.

दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील तिरप, चांगलांग आणि लोंगडिंग जिल्हे आणि नामसाई जिल्ह्यातील तीन पोलिस स्टेशन क्षेत्रात 1 एप्रिलपासून आणखी सहा महिन्यांसाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे. तथापि, मणिपूरशी संबंधित अधिसूचनेत म्हटले आहे की, 'केंद्र सरकार, मणिपूर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर, सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा, 1958 च्या कलम 3 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, पाच जिल्ह्यांमधील खालील 13 पोलिस ठाण्यांच्या अखत्यारीत येणारे क्षेत्र वगळता, संपूर्ण मणिपूर राज्य 1 एप्रिलपासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी, येथे सामान्य परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत 'अशांत क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात येत आहे.'

'या' क्षेत्रांमध्ये AFSPA प्रभावी होणार नाही -

प्राप्त माहितीनुसार, राज्यातील इम्फाळ, लामफेल, सिटी, सिंगजामेई, पतसोई, वांगोई, पोरोमपत, हिंगांग, इरिलबुंग, थौबल, बिष्णुपूर, नंबोल आणि काकचिंग पोलिस स्टेशन परिसरात AFSPA लागू राहणार नाही.