Deep Sidhu (Photo Credits: ANI)

पंजाबी अभिनेता आणि लाल किल्ल्यावरील हिंसाचाराचा आरोपी दीप सिद्धू (Deep Sidhu) याचा हरियाणातील सोनीपत येथे एका रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. कुंडली-मानेसर-पलवल द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला. दीप सिद्धू शेतकरी आंदोलनादरम्यान चर्चेत आला होता. लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात त्याला आरोपी ठरवण्यात आले होते आणि त्यासाठी तो तुरुंगातही गेला होता. मात्र, नंतर त्याचा जामीन मंजूर करण्यात आला.

15 फेब्रुवारीच्या रात्री, 102 कमला नेहरू कॉलनी (भटिंडा) येथील सुरजित सिद्धू यांचा मुलगा संदीप सिद्धू उर्फ ​​दीप सिद्धू हा त्याची मंगेतर रीना रायसोबत दिल्लीहून पंजाबला पिपली टोल येथून जात होता. अचानक त्यांची स्कॉर्पिओ ट्रकला धडकली आणि अपघातात त्यांचा मृत्यू झाला. टोल अॅम्ब्युलन्सने मृतदेह खारखोडा रुग्णालयात नेण्यात आला. त्यांच्यासोबत दोन मित्रही होते ते या अपघातामध्ये जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दीप सिद्धूचा मृतदेह खारखोडा रुग्णालयात आहे. तेथून ते सोनीपतला पाठवले जात आहे. अजून तपशिलांची वाट पाहत आहे. गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्याच्या निषेधार्थ आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली तेव्हा दीप सिद्धू चर्चेत आला होता. त्याचवेळी काही लोकांनी लाल किल्ल्यावर चढून धार्मिक ध्वज फडकवला होता. या प्रकरणात दीप सिद्धू याच्यावर आंदोलकांना भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून दीपला धमक्या येत असल्याचे सांगण्यात येत होते. (हेही वाचा: Sandhya Mukherjee Passes Away: प्रसिद्ध बंगाली गायिका संध्या मुखर्जी यांचे निधन)

प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारात 500 हून अधिक पोलीस जखमी झाले होते आणि एक आंदोलक ठार झाला होता. त्यावेळी आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर कोर्टात, दीप सिद्धूच्या वकिलाने त्याची बाजू मांडताना सांगितले की, त्याने लोकांना हिंसाचारासाठी भडकावल्याचे दाखवण्यासाठी त्यांच्या अशिलाविरुद्ध कोणताही पुरावा नाही. दरम्यान, दीप सिद्धू याच्या मृत्यूवर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत एस चन्नी यांनी शोक व्यक्त केला आहे.