Accident on Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; कार व ट्रकच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) पुन्हा एकदा भीषण अपघात (Fatal Accident) झाला आहे. गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या एका मालवाहू ट्रकला ब्रिझा कारची धडक बसून झालेल्या अपघातात चार प्रवाशांपैकी तीन प्रवासी ठार झाले असून, अन्य एक प्रवासी जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी राष्ट्रीय महामार्गावर चारोटीपासून सात किलोमीटर अंतरावर धानिवारी (Dhanivari) येथे झाला. मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या ब्रिझा कारच्या चालकाचा समोरच्या ट्रकचा अंदाज आला नाही व त्याने मागून ट्रकला धडक दिली.

अपघातादरम्यान चालक व्यतिरिक्त इतर प्रवासी गंभीर जखमी झाले कारण त्यांनी सीट बेल्ट घातला नसावा. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर तिसऱ्या जखमीला धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दीपक अग्रवाल (58), सुमित्रा अग्रवाल (78), सत्यनारायण अग्रवाल (80) यांचा समावेश आहे. केतन अग्रवाल (25) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे.

खानवेल येथील एका लग्न समारंभातून हे कुटुंब कल्याणला परतत होते. या अपघात स्थळापासून काही किलोमीटर अंतरावर 4 सप्टेंबर रोजी उद्योजक सायरस मिस्त्री यांचा असाच अपघात झाला होता. राष्ट्रीय महामार्गावरील या चारोटी भागात अनेक अपघात झाले आहेत. महामार्गाच्या या स्पॅनवर अवजड वाहनांकडून लेनची शिस्त आणि सुरक्षेचे उपाय पाळले जात नाहीत, अशा तक्रारीदेखील आल्या आहेत. (हेही वाचा: पुणे ते कात्रज रस्ता एकेरी वाहतूक करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश)

याआधी सप्टेंबरमध्ये मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरीजवळ रात्री उशिरा आणखी एक भीषण अपघात झाला होता. या घटनेत सुरतचे दोन व्यापारी आणि एका टेम्पो चालकासह तिघांचा मृत्यू झाला. मागील सीटवरील दोघे गंभीर जखमी झाले होते. जखमींना वापी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर सुरत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.