नवीन वर्षाच्या निमित्ताने लोकांनी ऑनलाइन फूड (Online Food) ऑर्डरिंग अॅवरून मोठ्या प्रमाणावर जेवण मागवले आहे. यामध्ये झोमॅटोने (Zomato) मोठ्या प्रमाणावर बाजी मारली आहे. कोविड-19 साथीच्या काळात अनेक राज्यात रात्रीच्या वेळी लागू केल्या गेलेल्या कर्फ्यूमुळे लोकांनी झोमॅटोच्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर देण्यास प्राधान्य दिले. आता माहिती मिळत आहे की, नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी झोमॅटोला प्रति मिनिट 4,000 हून अधिक ऑर्डर मिळाल्या आहे. निश्चित सांगायचे तर, प्रती मिनिट 4,254 ऑर्डरींची संख्या झोमॅटोने गाठली आहे.
झोमॅटोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी ट्विटद्वारे याबद्दल माहिती दिली. ट्वीटमध्ये त्यांनी एकूण किती व्हॅल्यू ऑर्डर येत आहेत आणि या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांच्या टीमवर किती दबाव आहे हेदेखील सांगितले. 31 डिसेंबर 2020 रोजी रात्री 07:53 वाजता गोयल यांनी ट्वीट केले की, 'सध्या सिस्टमवर प्रचंड दबाव आहे. आता 1.4 लाख ऑर्डर्स आल्या आहेत. यापैकी सुमारे 20 हजार बिर्याणी आणि 16 हजार पिझ्झा ऑर्डर आहेत तसेच यापैकी सुमारे 40 टक्के एक्स्ट्रा चीज पिझ्झा आहेत.’
गोयल यांनी असेही सांगितले की, भारताबाहेर राहणाऱ्या लोकांनाही भारतात राहणाऱ्या लोकांसाठी जेवणाची ऑर्डर दिली होती. विशेषत: युएई, लेबनॉन आणि तुर्कीमधील लोकांनी आपल्या जवळच्या भारतामधील लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स दिल्या. गोयल पुढे म्हणाले, ‘काल रात्री प्राप्त झालेल्या ऑर्डर्स पूर्ण करण्याचा फार मोठा दबाव आमच्यावर होता. पीक टाइमच्या आधीच आमची डिलिव्हरी करण्याची क्षमता संपली. जर आमच्याकडे अनियंत्रित पुरवठा असेल तर आम्ही काल 100 कोटी GMV पूर्ण करू शकलो असतो. पुढील वेळी अधिक चांगले करण्याची आवश्यकता आहे.’ (हेही वाचा: 2021 च्या अखेरीस भारताची अर्थव्यवस्था कोविड-19 पूर्व पातळीवर पोहचेल- NITI Aayog Vice-Chairman)
काल झोमॅटोने या सर्व ऑर्डर वितरीत करण्यासाठी जवळजवळ 100,000 वितरण भागीदारांसह काम केले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, झोमॅटोने 660 दशलक्ष किंवा 4,850 कोटी रुपयांचे फंडिंग राउंड पूर्ण केले. त्यानंतर कंपनीचे मूल्य जवळजवळ 3.6 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले.