Delhi Crime Branch (Photo Credits-ANI)

कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातले असून त्याच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. तसेच सरकारने धार्मिक आणि अन्य कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्यास ते रद्द केले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीत तबलीगी जमातीकडून एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जवळजवळ 16 देशातील नागरिकांनी दिल्लीत उपस्थिती लावली होती. निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमाला जवळजवळ 2300 लोकांनी उपस्थिती लावल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अधिक तपास करण्यात येत आहे. तसेच तबलीगी जमातीचे प्रमुख मौलानांसह अन्य जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात मोठ्या संख्येत लोक आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर हे सर्वजण आपापल्या घरी परतले. त्यापैकी काही जणांना करोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. देशातील निरनिराळ्या भागातून या ठिकाणी लोक आल्याने त्यांना युद्धपातळीवर शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या काही जणांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र आता दिल्ली गुन्हे शाखेकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच मौलाना मुलाना साद यांच्यासह अन्य काही जणांच्या विरोधात साथीच्या रोग कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.(Coronavirus: छत्तीसगढ येथे तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या 16 वर्षीय मुलाला कोरोना व्हायरसची लागण)

मरकजच्या कार्यक्रमानंतर कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. तसेच विविध स्तरातून तबलीगी समाज आणि मरकजच्या कार्यक्रमाच्या विरोधात जोरदार टीका केली जात आहे. 17 राज्यातील 1023 कोरोना व्हायरसची प्रकरणे तबलीगी जमातीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. त्याचसोबत मोदी सरकारमधील केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी तबलीगी समाजाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार माफीच्या लायक नसून “तालिबानी जुर्म”असल्याचे म्हटले होते.