Tejas Express (Photo Credits: Instagram)

सुपरफास्ट तेजस एक्सप्रेस च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! रेल्वेतील पदार्थांना कंटाळलेल्या प्रवाशांना आता तेजस एक्सप्रेस वेगवेगळ्या लज्जतदार अशा खाद्यपदार्थांची मेजवानी देणार आहे. खासगी मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेसमध्ये (Mumbai-Ahmedabad Tejas Express) खवय्यांना शाकाहारी बिर्याणीसह, कढी-भात, राजमा चावल यांच्यासह श्रीखंड, गुलाबजाम, रसगुल्ला यांसारखे गोड पदार्थही ठेवण्यात आले आहेत. राज्यात आणि गुजरातमध्ये खाद्यसंस्कृती मोठ्या प्रमाणात जोपासली जाते. यामुळे या दोन्ही राज्यादरम्यान सुरू होणाऱ्या खासगी रेल्वेतील खवय्यांची काळजी घेण्यासाठी विशेष 'मेन्यू' तयार करण्यात करण्यात आला आहे.

तेजस एक्सप्रेसमध्ये सुरुवातीच्या काळात संपूर्ण जेवण दिले जात होते. मात्र रेल्वेची गती पाहता रेल्वे प्रवाशांना या जेवणाचा नीट आस्वादही घेता येत नव्हता. म्हणून आता संपूर्ण जेवण देण्यापेक्षा नाश्ता, कॉम्बो मिल आणि मिठाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेदेखील वाचा- तेजस एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता सामानाचा बोझा उचलावा लागणार नाही

या खमंग खाद्यपदार्थांचा वडापावसह कोंथिबीर वडी, ग्रीन पीज समोसा आणि उपवास असणाऱ्यांसाठी साबुदाणा वडाही ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर व्हेज बिर्याणी, राजमा चावल, गुलाबजाम, श्रीखंड यांसारखे स्वादिष्ट पदार्थही ठेवण्यात आले आहेत.

खासगी तेजस एक्स्प्रेसमधील वातानुकूलित चेअरकार (सीसी) प्रवाशांच्या सकाळच्या चहामध्ये चहा, ग्रीन टी, लेमन टी असे पर्याय आहेत. तर, एक्झिक्युटिव्ह चेअरकारमध्ये (ईसी) वरील पर्यायांसह शहाळे देखील उपलब्ध आहे. सायंकाळच्या नाश्त्यासाठी प्रवाशांना मसाला खाकरा, भाकरवडी, चकली, मेथी खाकरा आणि खांडवी असे पर्याय आहेत. सॅन्डविचमध्ये चीझ सॅन्डविच, टोमॅटो सॅन्डविच असे पर्याय असणार आहेत, असे आयआरसीटीसीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

लहान मुलांचाही विचार करता तेजस एक्सप्रेसमध्ये आईस्क्रीम, म्हैसूर पार, काला जामुन यांसारखे गोड पदार्थही ठेवण्यात आले आहेत.